गडचिरोली:- पुरुषप्रधान संस्कृतीची आणि कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता चौघा बहिणींनी आपल्या लाडक्या पित्याच्या पार्थिवाला खांदा व मुकाग्नी देत एक वेगळी पायंडा पाडला. देसाईगंज तालुक्यातील चिखली रिठ गावात अंतिम निरोपाचा हा दुःखद प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला.
चिखली रिठ येथील ८० वर्षाचे बाबुराव मडावी हे थोडीफार शेती करत आपल्या पत्नीसोबत उदरनिर्वाह करायचे. त्यांना चारही मुलीच होत्या.त्यांचे शिक्षण आणि लग्नासाठी बाबुराव यांनी रक्ताचा पाणी केला होता.वृद्धापकाळ आणि मागील काही दिवसंपासून आजाराने ग्रस्त असल्याने त्यांचा (मंगळवारी) १२ मार्च रोजी अचानक निधन झाले. काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या चार मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला यावेळी उपस्थित नातेवाईकांसह गावकऱ्यांचे डोळे पाणावले.
जिवाफाड प्रेम असलेल्या पित्याची प्राणज्योत मालवली त्यानंतर या चौघींनी गावकऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्काराची तयारी केली.उत्तरा, अनुताई,ललिता आणि निराशा या चार मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला.पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. तोपर्यंत स्थितप्रज्ञ राहून संयमाने सर्व तयारी केली. चिता धडधड पेटल्यावर मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी हंबरडा फोडत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले.