अहिल्यानगर :संपूर्ण राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी ४८ तासांत सामान्यांपासून दीड ते ३ अंश सेल्सियस तापमान कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी ९.५ अंश सेल्स तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट आहे. त्यामुळे नागरिकांसह पशुपक्षी, शेती पिकांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने सर्दी , खोकला, कफ अशा आजारांना निमंत्रण मिळत आहे. सध्या रब्बीच्या गव्हाचा मौसम असल्याने थंडीचा त्याला फायदा होऊ शकतो. मात्र, मोठ्या प्रमाणात गारवा पसरल्याने दैनंदिन जनजीवनावर त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. असेच तापमान आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.