गडचिरोली: राज्य शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव उपक्रमात गोंडवाना सैनिक विद्यालय तथा उच्च महाविद्यालय गडचिरोली हे नागपूर विभागातून अव्वल स्थानी आलेले आहे. नुकतेच राज्य शिक्षण संचालकांच्या चमुने या शाळेची पाहणी करून मूल्यांकन केले त्यात सदर शाळा राज्यस्तरावर झेप घेतली आहे.
विद्यार्थी दहशत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनून जाते शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करून शिक्षण आनंददायी प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर उपक्रमाला जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झाली होती त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास 90% शाळांनी सहभाग नोंदविला होता. टप्प्याटप्प्यानुसार विशेष अधिकारी वर्गांकडून विविध मुद्द्यावर शाळेचे मूल्यांकन करून गुणदान करण्यात आले होते.
यामध्ये केंद्र, तालुका, जिल्हा व विभाग या सर्व स्तरावर गोंडवाना सैनिकी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आणि राज्यस्तरापर्यंत मजल मारली. विभागावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी राज्य मूल्यांकन समिती गोंडवाना सैनिकी विद्यालयात दाखल झाली या समितीमध्ये राज्य शिक्षण संचालक शरद गोसावी, हिंगोली चे शिक्षणाधिकारी सोनटक्के, शिक्षणाधिकारी फुले यांचा समावेश होता. मूल्यांकन समितीने संपूर्ण मुद्द्याला धरून विशेष तपासणी केली.
सदर उपक्रमात शाळा अव्वल आल्याबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीचे सचिव तथा मंत्री धर्मराव बाबा आत्राम, अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, मार्गदर्शक ऋतुराज हलगेकर यांनी कौतुक केले.
*या मुद्द्यावर झाले मूल्यांकन*
शाळेत व शालेय परिसर स्वच्छता, वर्ग सजावट व रंगरंगोटी, तंबाखूमुक्त शाळा घोषित करणे, विद्यार्थी पूरक आहार, चित्रकला स्पर्धा आयोजन, जलजीवन मिशनचा शाळेत पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, त्याची योग्य जोपासना केली जाते, झाडांना पाणी येते का, या बाबीची पाहणी करण्यात आली, बालवाचनालय, बालवाचन नवोपक्रम, पेपर मध्ये लेख, बातम्या, संग्रहित फाइल्स, विविध सामाजिक कार्यक्रम, तसेच विविध थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदी या मुद्द्यांच्या अनुषंगाने मूल्यांकन करण्यात आले. दिवसभर प्रत्येक बाबीचे बारकाईने मूल्यांकन केल्यावर शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्वतः विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेतली. शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जाही यावेळी तपासण्यात आला.