भंडारा :- ३५ वर्षांपूर्वी कारसेवक म्हणून प्रभू श्रीरामांची सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून मनात अयोध्येतील श्री राम मंदिराचा ध्यास लागून होता. तो क्षण जवळ आला असताना पुन्हा एकदा, कारसेवक असलेल्या खासदार सुनील मेंढे यांनी रामासाठी अनोख्या पद्धतीने सेवा देण्याचा निर्णय घेत, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात श्री राम रथयात्रा काढण्याचा निर्धार जाहीर करीत आज २ जानेवारीपासून या श्री राम रथयात्रेला सुरुवात झाली. पवनी तालुक्यातील अड्याळ येथून निघालेला श्रीरामांचा रथ आता २१ तारखेलाच थांबणार आहे.
बजरंग दलाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी होत प्रभू श्रीरामांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. एक कारसेवक म्हणून काही संकल्पही त्यावेळी आजचे खासदार सुनील मेंढे यांच्याकडून केले गेले होते. असंख्य कारसेवकांच्या बलिदानातून, विश्वास आणि रामाप्रती असलेल्या प्रचंड श्रद्धेतून आज राम मंदिर पूर्णत्वास जाऊन प्रत्यक्षात प्रभू श्री रामचंद्र २२ जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान होत आहेत. स्वप्नपूर्तीच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३५ वर्षांपूर्वीचा खासदारांमधील कारसेवक स्वस्थ कसा बसू शकतो. श्रीरामा प्रती असलेल्या अपार श्रद्धेतून पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी अनोख्या पद्धतीने प्रभुंची सेवा करण्याचा निर्णय घेत संपूर्ण लोकसभा मतदारसंघात श्रीराम रथयात्रा काढण्याचा निर्धार जाहीर केला.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही श्री राम रथयात्रा भ्रमण करणार असून या यात्रेतून खासदार सुनील मेंढे गावागावात जाऊन नागरिकांना २२ जानेवारी रोजी प्रभुंच्या स्वागतासाठी आणि दिवाळी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडा असे आवाहन करणार आहेत. आज २ जानेवारी रोजी पवनी तालुक्यातील अड्याळ येथून या श्रीरामरथयात्रेचा श्री गणेशा झाला. आकर्षक अशा सजविलेल्या रथात विलोभनीय अशी श्रीरामाची मूर्ती, मंद स्वरात सुरू असलेल्या रामधून मुळे निर्माण झालेले राममय वातावरण अशा प्रसन्न वातावरणात निघालेल्या या श्रीरामरथयात्रेची गावागावात होणारे स्वागत आणि मिळणारा उदंड प्रतिसाद लोकांच्या मनातील रामभक्ती व्यक्त करणारा आहे. विशेष करून मातृशक्तीकडून ज्या पद्धतीने श्रीरामरथ यात्रेचे स्वागत केले जात आहे, तो प्रतिसाद पाहता खऱ्या अर्थाने हा स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे असेच वाटून जाते.
अड्याळ येथून निघालेल्या या रथयात्रेचे मार्गाने कोंढा, भावड, खैरी दिवान, भुयार, दिवाण, भोजापुर, पवनी, आसगाव या गावांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. शक्य तिथे खासदारांकडून उपस्थिताना संबोधित केले गेले. एक कारसेवक म्हणून आलेला अनुभव, कार सेवेच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती आणि आज साकार होत असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर हे कोटयावधी भारतीयांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे फलित असल्याचे सांगून २२ जानेवारी हा दिवस दिवाळी सारखा साजरा करा, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले. यावेळी खासदारांकडून ग्रामस्थांना पणत्यांचे वाटप करण्यात आले. पणत्यांच्या प्रकाशात आसमंत उजळून काढा असे भावनिक आवाहन यावेळी खासदारांनी केले.
भंडारेकरांनी दिला निरोप
पवनी तालुक्यातून सुरू झालेल्या रथयात्रेला जाण्यापूर्वी भंडारा शहरातील बहिरंगेश्वर श्री राम मंदिरातून ही रथयात्रा रवाना झाली. रामप्रभू चे पूजन आणि आरती करून मार्गस्थ झालेल्या या रथयात्रेला अनेक मान्यवर आणि रामभक्तांनी उपस्थित राहून निरोप दिला. यावेळी खासदारांनी २२ जानेवारी साठी सज्ज रहा असे उपस्थित त्यांना सांगितले.
यावेळी रथयात्रेत भंडारा विधानसभा प्रभारी अनुप ढोके, तालुकाध्यक्ष मोहन सुरकर, प्रकाश कुर्जेकर, अमोल उराडे, हिरालाल वैद्य, माधुरी नकाते,सीमा मोहिते, प्रभावती खोब्रागडे, डॉ.उल्हास हरडे, शिवशंकर मुनघाटे, ताराबाई कुंभलकर, अतुल मुलकलवार, देवानंद खोपे, दिनेश कोरे, परशुराम समरीत, सोमा लोहकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..