अहेरी :- माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण,पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांनी फुले यांच्या जीवनावर बोलत ते म्हणाले की,महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल डूडल प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले.