पुलगाव – “सहज शिक्षा लर्निंग ॲप”चा शुभारंभ पुलगाव देवळी विधानसभा क्षेत्रात १ जानेवारी 2024 ला होणार आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या इंग्रजी,मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीकरता सहज शिक्षण या क्रांतिकारक प्रयोगाची सुरुवात राजेश बकाने यांचे चिरंजीव गौरेश बकाने यांनी केली आहे.
या ॲपच्या माध्यमातून इंग्रजी गणित व विज्ञान विषयाच्या इंग्रजी, मराठी व सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांकरता ऑनलाइन ट्युशनची २४ तास सुविधा दिली आहे. या ॲपमध्ये कमी इंटरनेटचा वापर,शिक्षणाच्या सोप्या पद्धती, १००० पेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडिओ, अभ्यास करण्याची सोपी पद्धत, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन,अभ्यास करीत असताना डोळ्यावर ताण येऊ नये यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा प्रयोग केलाय.हे अत्याधुनिक ॲप असून एका विशिष्ट वेळेत घेतली जाणारी ऑनलाईन शिकवणी नाही. त्यामुळे आपल्या सोयीनुसार वेळेवर त्याचा अभ्यासक्रमातील कोणताही भाग धडा (चॅप्टर )व कोणत्याही भागावर ट्युशन घेऊ शकतो. हा संपूर्ण अभ्यासक्रम,त्याचा स्वाध्याय परीक्षा पेपर व रिविजन रेकॉर्ड असल्यामुळे याचा प्रयोग आपल्या सोयीनुसार शक्य आहे. पुण्यात व मुंबई हजारो रुपये खर्च करून हे ॲप घेण्यात येते. पण पुलगाव देवळी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हे ॲप निशुल्क राहणार असे पुलगाव येथील पत्रकार परिषदेत भाजपा पुलगाव देवळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाने यांनी सांगितले.
यावेळी भाजप राज्य कार्यकारणी सदस्य राजीव बत्रा, भाजपा जिल्हा महामंत्री राहुल चोपडा,पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, नाचणगाव मंडळ अध्यक्ष ओंकार राऊत, व्यापारी आघाडी जिल्हा सचिव जगदीश टावरी, महिला आधाडी अध्यक्ष जयश्री मोकदम, रिता येटीवार, विनोद माहुरे, मनोज
वालदे उपस्थित होते.
या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे शहरात शिकायला येतात. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ट्युशन ची सोय नसल्यामुळे शहरात ट्युशन करता थांबणे शक्य नसते. वेळ तसेच वाहतुकीच्या साधनाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम पडतो व ग्रामीण भागातील विद्यार्थी करिअरच्या स्पर्धेत मागे राहतो. परंतु सहज शिक्षा ॲप हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. असे प्रात्यक्षिक अंतर्गत गौरेश बकाने यांनी सांगितले.