मूल :- गरीब आणि गरजु नागरीकांना त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने घरकुल योजना मंजुर केली असुन मूल तालुक्यात 4 हजार 17 घरकुल मंजुर आहेत ,मात्र घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध नसल्याने जवळपास 5 हजार रूपये ब्रास प्रमाणे वाळू खरेदी करावे लागत असुन अनेक लाभार्थ्यांनी अजुनही घरकुलाचे बांधकामाला सुरूवात केलेली नाही. यामुळे शासनाने तात्काळ वाळू घाटाचे लिलाव करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
शासनाने ग्रामीण भागातील कुटुंबाचा विकास करण्याच्या दृष्टीने विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून मूल पंचायत समिती अंतर्गत या वर्षासाठी 1954 लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातुन तालुक्यातील 1174 घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.अनुसुचित जाती,नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचावने व त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत 320 घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली आहे. अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी शबरी आवास योजनेच्या माध्यमातुन 250 घरकुलांना मान्यता प्राप्त झाली आहे. तर नगर पालिका क्षेत्रात रमाई आवास योजनेचे 137 तर पंतप्रधान आवास योजनेचे 183 प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली आहे.सदर घरकुलांना मान्यता प्राप्त झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न साकार होणार आहे.
तालुक्यात वाळू घाटांचा लिलाव झालेला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना जवळपास 5 हजार रूपये ब्रास प्रमाणे वाळु खरेदी करावेे लागत आहे.यामुळे अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम थांबवुन दिलेले आहे. निवाऱ्याचा प्रश्न कायम सुटावा यासाठी शासनाने घरकुल मंजुर केलेले आहेत परंतु जादा दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याने अनेकांचे घरकुलाचे स्वप्न यावर्षीही पुर्ण होणार की नाही या चिंतेत घरकुल लाभार्थी आहेत.
जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यासाठीही वाळूची आवश्यकता आहे,शासनाने मूल तालुक्यातील घरकुल लाभार्थी, विकासकामे व जनतेचा विचार करून मूल तालुक्यातील वाळूघाटांचा तात्काळ लिलाव करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार,जिल्हाधिकारी,जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे केली आहे. यावेळी शहराध्यक्ष आकाश येसनकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संगीता गेडाम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहित कामडे , निहाल गेडाम उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लवकरच डेपो सुरु करून घरकुल लाभार्थ्यांना व घर बांधकाम करणाऱ्या नागरीकांना सरकारी दरानुसार वाळू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.