पुलगाव रुग्णालयात महिला डॉक्टर नसल्याने परिचारिकेलाच करावी लागते प्रसूती
पुलगाव/अविनाश भोपे
महिलांवर उपचार करण्याकरिता तज्ञा महिला डॉक्टरची पुलगाव रुग्णालयाला गरज आहे .वारंवार मागणी करून देखील या रुग्णालयाला डॉक्टर मिळत नाही, प्रसूती करिता महिला रुग्ण आल्यावर त्यांना वर्धा, सावंगी किंवा सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात येते .प्रसुतीची वेळ जवळ आली असेल तर मात्र परिचारिकेलाच प्रसूती करावी लागते. गेल्या अनेक दिवसापासून हाच प्रकार या रुग्णालयात सुरू आहे.
मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी सकाळी एक गरोदर महिला प्रसुतीकरिता पुलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आली महिला डॉक्टर नसल्याने उपस्थित डॉक्टरांनी वर्धा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला .ती महिला वर्धा रुग्णालयापर्यंत पोहोचेल अशी स्थिती नव्हती वाटेतच तिची प्रसुती होईल असे उपस्थितांना जाणवत होते. येथील निवासस्थानामध्ये राहणारी परिचारिका त्यावेळी ग्रामीण रुग्णालयात आली त्यांनी परिस्थिती पाहिली व उपस्थितांना या महिलेला वर्धा रुग्णालयात पाठवू नका वाटतेतच तिची प्रसूती होईल असे सांगितले. तिला रुग्णालयात दाखल करून घेतले व अवघ्या काही वेळानंतर त्या महिलेची प्रसूती झाली.
पुलगाव ग्रामीण रुग्णालयात एकही एमबीबीएस महिला डॉक्टर कार्यरत नाही त्यामुळे गरोदर महिलांची फजिती होत आहे .ग्रामीण भागातील अनेक प्रस्तुत महिला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात येतात त्यांना महिला डॉक्टर नसल्याने योग्य उपचार मिळत नाही, ही वास्तविकता आहे .ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आर्थिक अडचण असताना देखील खाजगी डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागतात त्यातून त्यांची लूट होते.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून या रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी संपावर आहेत त्यामुळे कायमस्वरूपी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भार आला आहे. एकंदरीतच तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने पुलगाव ग्रामीण रुग्णालय रामभरोसे असल्याचे दिसते. या रुग्णालयाला शहर तथा ग्रामीण भागातील नागरिक ग्रामीण रुग्णालया ऐवजी रेफर रुग्णालय या नावाने संबोधतात.
बीपी वाढला वर्धेला जा
बीपी, शुगर हा आजार हल्ली प्रत्येकाला दिसतो, थोडा जरी बीपी वाढला व तो रुग्ण तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात आला तर त्याला येथे औषधोपचारा ऐवजी वर्धा येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो. रोज हा सल्ला किती लोकांना मिळतो हे मात्र सांगता येत नाही.
रुग्णसेवा परिचारिकेवर अवलंबून
येथील रुग्णालयात फक्त परिचारिका कार्यरत असतात त्या कार्यरत राहण्याची निश्चित वेळ आहे .परिचारिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो .रात्रभर रुग्णांची ये जा असते, सर्व रुग्णांना इंजेक्शन, सलाईन, औषधी वितरित करण्यापासून येथील नोंदबुकात नावाची नोंदणी करून घेणे आदी सर्वच कामे या परिचारिकांना करावी लागते. रात्री एकच परिचारिका येथे कार्यरत राहते तिची काय अवस्था होते याचा विचार जिल्हा आरोग्य अधिकारी करणार काय ?