गडचिरोली :- आलापल्ली येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. चरणजितसिंह सलुजा यांना राज्य शासनाने आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर केला आहे.
आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने राज्य शासनातर्फे अशा व्यक्ती आणि संस्थांना अनुक्रमे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याविषयीची घोषणा राज्य शासनाने आज (२३ नोव्हेंबर ) केली. त्यात आलापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. चरणजितसिंह सलुजा यांचाही समावेश आहे.
डॉ. सलुजा यांनी आदिवासींच्या हिताकरिता भरीव कार्य केले असून, दुर्गम भागातील आदिवासींना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ते नेहमी धडपडत असतात. या कार्यासाठी त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चाहत्यांनी डॉ. सलुजा यांचे अभिनंदन केले आहे.