गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींचे अंतिम निकाल मंगळवारी समोर आले आहेत. ज्यात दोन ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना एकसमान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढावी लागली. यात एकाचा विजय आणि दुसऱ्याला पराभवाचा सामना करावा लागला. सिरोंचा आणि भामरागड या दोन्ही तालुक्यातील घटना जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पहिली घटना ही सिरोंचा तालुक्यातुन समोर आली. तालुक्यातील कोटापल्ली ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच परिवारातील दोन भावंडांच्या अर्धांगिनी निवडणुकीत एकमेकींच्या विरोधात रिंगणात होत्या. एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून समक्का राजेश पोलमपल्ली तर भाजपकडून मुतक्का रमेश पोलमपल्ली रिंगणात होत्या. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. आपणच विजय होणार असा विश्वास दोन्ही गटाकडून व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान मतमोजणी वेळी दोघींना ८७ मते समान मते मिळाल्याने ईश्वरचिटी काढण्यात आली . ज्यात मुत्तक्का राजेश पोलमपल्ली यांचा विजय झाला.
तर दुसरी घटना भामरागड तालुक्यातील टेकला ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक लढणाऱ्या दोन उमेदवारांना समान मते मिळाली . ज्यात कमली संतु गावडे (आविस) आणि मीना पेक्का हेडो (राकॉ) यांना ३७ मते मिळाली. त्यामुळे एका लहान मुलाच्या हाताने ईश्वर चिट्ठी टाकून निवड केली असता मीना पेक्का हेडो राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विजयी झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कोरची, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर सिरोंचा आणि भामरागड दोन तालुक्यात समसमान मते मिळालेल्या उमेदवारांचे भविष्य दोन छोट्या मुलांनी ठरविल्याचे दिसून आले. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली हे विशेष.सिरोंचा तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
जितेंद्र शिकतोडे यांनी तर भामरागड तालुक्यात
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश पुप्पलवार
यांनी कामकाज सांभाळले.