एमपीएससीच्या अंतिम चाचणीत राज्यात दुसरी
कर व मंत्रालयीन सहाय्यक पदाकरिता निवड
गडचिरोली ( आनंद दहागावकर) :- एटापल्ली तालुक्यातील बिड्री या लहानश्या खेड्यातील कु. अश्विनी डोनारकर ही कठीण परिस्थितीवर मात करून सन ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत यश संपादित करुन मंत्रालयीन कर सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे वडील सामान्य शेतकरी व आई गृहिणी आहे. कोणतेही शिकवणी वर्ग न लावताच प्रचंड परिश्रम, जिद्द व चिकाटीने परिस्थितीवर मात करत तीने यश संपादित केलेले आहे. खरोखरच तिचे यश इतरांना प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘क’ वर्ग प्रवर्गातील पदांसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार नुकताच लागलेल्या अंतिम टप्प्यातील कौशल्य चाचणीत उपविभागातील बिड्री गावची अश्विनी अशोक दोनारकर हिने राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात द्वितीय क्रमांकाने पास होऊन कर सहाय्यक व मंत्रालयीन सहाय्यक पदाकरिता निवड झाली आहे. त्यामुळे दुर्गम, आदिवासी बहुल भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरलेली अश्विनीचे कौतुक अहेरी उपविभागात होत आहे. एमपीएससीच्या कोरोना काळातील 2021 च्या क प्रवर्गातील मुख्य परीक्षेत आवेदन पत्रे मागितली होती. नंतर विलंबाने आगस्ट 2022 मध्ये मुख्य परीक्षा संबंधित उमेदवारांची घेण्यात आली. यात 11 महिलांच्या राखीव पदाकरिता अहेरी उपविभागातील एटापल्ली तालुक्यातील बिड्री या दुर्गम भागातील कु. अश्विनी अशोक दोनारकर ही सुद्धा आवेदन करून मेहनत व जिद्दी सोबत आपुलकी केली. तिच्या सततच्या मेहनतीच्या जोरावर नुकतीच निवड चाचणीत अंतिम असलेल्या संगणकासह इंग्रजीतील कौशल्यात तिने अनुसूचित जातीतील महाराष्ट्रातून 119 मार्क्स घेऊन द्वितीय स्थान पटकाविले.दुर्गम व डोंगराळ भागातील विवेकानंद हायस्कूल येमली येथे दहाव्या वर्गात शिकलेल्या अश्विनीने बारावीचे शिक्षण गडचिरोली येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात घेतले. त्यानंतर पदवी करिता शासकीय महाविद्यालय गडचिरोली येथे प्रवेशित घेऊन प्रथम श्रेणीत पदवी घेतली. तेथीलच अभ्यासिकेत मन लावून एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा दररोज सराव करून यश संपादन केल्याची माहिती तिने दिली.
आई गृहिणी व वडील शेतीकरी,शेती काम करीत असलेल्या अश्विनीची कौटुंबिक परिस्थिती गरिबीची आहे. तरी प्रथम वर्षात शिकत असलेल्या बहिणीसह अश्विनीला सुद्धा तिच्या यशात आई-वडिलांचा खूप वाटा असल्याचे ती बोलली.
यशाच्या वाटेत अनेक अपयशाची काटे येत गेले मात्र माता – पिता , मित्र – मैत्रिणी व गुरुजन यांच्या धैर्यरूपी शौर्याची थाप तिच्या पाठीवर नेहमी सोबत असायची.
पुढील काळात एमपीएससीच्या प्रथम वर्गाच्या परीक्षेची तयारी यशस्वी करू पाहण्याचा संकल्प घेतलेल्या अश्विनीने उपविभागातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सरावाने योग्य करावी. तसेच स्पर्धा परीक्षेतील यश व अपयश येत राहणार पण नकारार्थी न राहता पुढील वाटचाल जिद्दीने, मेहनतीने सुरूच ठेवण्याचे आवाहन तिने यावेळी बाकी स्पर्धा परीक्षा करू पाहणाऱ्या मित्रांना केले आहे.
शासनाने अतिदुर्गम व मागास अहेरी उपविभागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करू पाहणाऱ्या मुला मुलींसाठी विशेष योजना म्हणून सुसज्ज वाचनालय व वर्ग घेऊन सहकार्य करावे अशी विनंती तिने यावेळी केली आहे.