गडचिरोली:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवून ते मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांचा प्रभाव देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत घोषणा करून जबाबदारी दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय दौरे करून जिल्हाध्यक्ष प्रमुख नेते, फ्रंटल व सेल मधील सर्व पदाधिकारी,अन्य मान्यवर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून पक्ष संघटनेचा आढावा घेण्याची सूचना प्रदेशाध्यक्षांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिली आहे. पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीने सामान्य व्यक्तींशीही संपर्क करून त्यांच्या बैठका घ्याव्यात.यामुळे पक्षाचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोचविण्यास मदत होईल.
जिल्हा तसेच तालुकास्तरावरील पेरेंट बॉडी, फ्रंटल व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांसाठी नियुक्तीचे प्रस्ताव पाठविण्याचेही आवाहन प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केले. ना.अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, छगन भुजबळ व अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याबाबत तात्काळ कार्यवाही करता येईल.आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सक्षम उमेदवारांची चाचपणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून पक्षाला चांगल्या प्रकारचे यश मिळू शकेल आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.