वरोरा : भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेणारी मुले शेतकरी किंवा शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील असतात. त्यामुळे आपण गरीब आहोत, आपली परिस्थिती बरोबर नाही. परिणामी आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. संघर्ष आणि परिस्थिती सर्वांच्या जीवनात कमी- अधीक प्रमाणात असते. परंतु परिस्थिती कधीही कुणाच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही. तेंव्हा परिस्थितीवर मात करून शिक्षण घ्या आणि जीवनात यशस्वी व्हा असे प्रतिपादन शिवसेना(ठाकरे) चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी तालुक्यातील सुमठाणा येथे केले. ते २४ जुलै रोजी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या शुभारंभाचे औचित्य साधुन गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना गणवेश वितरीत करण्यासाठी आले असता आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम गौरकर हे होते. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस सप्ताह विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी घेतला आहे. दि २४ ते ३० जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरित करणे तसेच आजारी लोकांना वैद्यकीय मदत करणे असे उपक्रम राबविले जातआहे.दरम्यान सर्वोदय विद्यालयातील कार्यक्रमात पुढे बोलताना मुकेश जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमित निब्रेट,शिवसेनेचे वरोरा विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, सुमठाणा येथील सरपंच शुभांगी दातारकर, पोलीस पाटील दुर्गा महाकळकर,मंगला हरणे,जेष्ठ शिक्षक ई.दा. बोढाले व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच शुभांगी दातारकर, मुख्याध्यापक एस. एम. गोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुकेश जिवतोडे यांनी स्वखर्चातून दहा विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले. तर शुभांगी दातारकर यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक भेट स्वरुपात दिले. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीव तोडे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वितरित करण्यात आले. याप्रसंगी सर्वोदय विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एस.एम गौरकर यांनी मुकेश जिवतोडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन अनिल पाटील यांनी केले. तर अमोल दातारकर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे अतुल नांदे, मेघश्याम आणि सर्वोदय विद्यालयाचे एम डी वनकर, एम व्ही काळे, संदीप खिरटकर, संजय पारोधे, पंढरी तळवेकर, हिरामण भगत व इतर कर्मचारी उपस्थित होते.