मुलचेरा:- यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासूनच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे धडे मिळणार आहेत. त्या अनुषंगाने नुकतेच 23 व 24 जूनला मुलचेरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाला केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विषयी तज्ञ व शिक्षकांची उपस्थिती होती. त्यामुळे आता इंग्रजीचे अध्ययन सोपे होणार आहे.
या प्रशिक्षणाचे उदघाटन शहीद वीर बाबुराव शेडमाके शाळेत संपन्न झाला.उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी येथील गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम होते.अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रल्हाद मंडल,प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून अहमदाबाद चे श्रीमती दिप्ती आणि पुणे येथील श्रीमती उत्पला मॅडम तसेच सत्यनारायण कोमरेवार,महेश मुक्कावार,देवनाथ बोबाटे,भाऊराव निखाडे चारही केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.
जॉली फोनिक्स हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख नियंत्रणात आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएटच्या मार्गदर्शनात सुरू होणार आहे. सदर उपक्रम इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इंग्रजी विषय शिकवताना पारंपारिक पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे इंग्रजी शब्दांच्या उच्चारणात बऱ्याच उनिवा असतात, सोबतच अभ्यासक्रमातील ही तिसरी भाषा असून परकीय भाषा असल्याने एक अनामिक भीती देखील विद्यार्थ्यांमध्ये असते परंतु इयत्ता पहिलीपासून ही भाषा आनंददायी पद्धतीने आणि योग्य उच्चारणासहित शिकविली गेली तर इंग्रजी विषयाची व्याप्ती नक्कीच वाढणार आहे.
जागतिक भाषा शिकवताना अडचणी येऊ नये यासाठी पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसमोर इंग्रजी विषय घेऊन जाणाऱ्या शिक्षकांची या प्रशिक्षणातून योग्य तयारी करून घेण्यात आली.अहमदाबाद आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शकांनी दोन दिवस अथक परिश्रम घेऊन शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले. अगदी आनंददायी वातावरणात दोन दिवसीय प्रशिक्षण पार पडले.तालुक्यात शहिद वीर बाबुराव शेडमाके शाळा आणि गतासाधन केंद्र असे दोन ठिकाणी चार केंद्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.तालुक्यातील एकूण 108 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.