महेश गुंडेटीवार/गडचिरोली:- राज्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक एसटी बसेस आणण्याचा प्रयत्न शासन करत असले तरीही गडचिरोली जिल्ह्यात एसटी बसमध्ये चक्क छत्री हातात घेऊन प्रवास करण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.पहिल्याच पावसात गडकी एसटी या लांबच्या पल्यासाठी दिल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.हा सगळा प्रकार अहेरी ते सिरोंचा रस्त्यावर धावणाऱ्या एका एसटी बस मध्ये घडला आहे. त्यामुळे अहेरी आगारातील एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक गाड्यांची काय स्थिती आहे हे आता तपासण्याची वेळ आली आहे. सामान्य प्रवाशांची एसटी अशी ख्याती असलेल्या प्रशासनाने एसटी बसेसची दुरुस्ती हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
अहेरी आगारावर अहेरी,सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा आणि गोंडपिपरी या सहा तालुक्यांचा धुरा आहे.या आगारात अनेक बसेस नादुरुस्त असून मार्गस्थ बिघाडीची संख्या वाढल्याने मागील अनेक वर्षांपासून अहेरी आगारात नवीन एसटी बसची मागणी केली जात आहे.मात्र, अजून पर्यंत ही मागणी पूर्ण झालेली नाही.त्यामुळे नाईलाजास्तव त्याच जुन्या बसेसवर अहेरी आगाराची मदार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
अहेरी आगारातील एसटी बसेस मध्ये नेहमीच मार्गस्थ बिघाड होत असल्याने प्रवाशांना भर रस्त्यावर उतरावे लागत आहे.अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.नुकतेच काही दिवसांपूर्वी मुलचेरा आणि चंद्रपूर रस्त्यावर एकच दिवशी दोन घटना घडल्या.रस्त्यावरील खड्डे,एसटी बसच्या घट लेल्या फेऱ्या आणि गावी पोहोचण्यासाठी लागणारा बराच वेळचा कालावधी या सर्व अडचणीमुळे अगोदरच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पहिल्याच पावसात एसटीमध्ये जलधारा बघायला मिळत आहे त्यामुळे प्रवाशांना आता चक्क एसटी बस मध्ये डोक्यावर छत्री धरून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे.
अहेरी ते सिरोंचा 107 किलोमीटरचा अंतर असून या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.कंत्राटदाराने पावसाळ्यात रस्त्यावर मुरूम टाकून ठेवल्याने अनेक वाहने चिखलात रुततांना दिसून येत आहे.या रस्त्यावर अजूनही बरेच ठिकाणी खड्ड्यांचा साम्राज्य जैसे थे आहे.त्यामुळे नाईलाजास्तव खाजगी वाहनधारकांना अन्य मार्गाने ये-जा करावे लागत आहे.मात्र,एसटी महामंडळाच्या बसला दुसरा पर्याय नसल्याने आहे त्याच परिस्थितीत प्रवाशांना ने-आण करावं लागत आहे. अशावेळी 107 किलोमीटर अंतर कापायला जवळपास पाच ते सहा तास वेळ लागत आहे.त्यात या मार्गावर चालविले जाणारे एसटी बस गळकी असल्याने प्रमाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.