कोरची:- तालुक्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊसाने चांगलेच झोडपले. वादळीवारासह विजांचा कडकडाट झाला. त्यामुळे वीज पुरवठादेखील खंडित झाला होता. परिणामी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले.
तालुक्यातील भिमपूर, कुकडेल या गावी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोरची तालुक्यातील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या १४ विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे खरेदी केलेले उघड्यावरील धान पावसात भिजले.
त्यामुळे बरेच नुकसान झाले. याशिवाय मोठ्या प्रमाणावरील विटाभट्टीचे देखील नुकसान झाले. शेतकऱ्यांचे भाजीपाला पीक, याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरची तालुक्यात तीन कि. मी. अंतरावर कुकडेल व भिमपूर या गावी तीन लग्न मंडप उडाले. शिवाय लग्न समारंभात गोंधळ उडाला.