भद्रावती : समाजाच्या जडणघडणीत लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची अत्यंत महत्वपूर्ण भुमिका असते. त्यांचे कर्तृत्व , त्यांचे आचार -विचार व त्यांची समाज सुधारण्याप्रती असलेली तळमळ समाजाला प्रेरणा देत असते. नवनिर्वाचीत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचे आजवरचे कार्य सामाजिक प्रगतीला चालना देणारे आहे. नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत गौरवास्पद आहे. त्यांनी स्वकर्तृत्वावर आपले विश्व शुन्यातून उभे केले. त्यामुळेच फार मोठया मताधिक्याने शिक्षक आमदार म्हणून ते विजयी झाले. दुसरीकडे लक्ष्मणराव गमे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी स्वतःला या कार्यात वाहून घेतले. यामुळे नवनिर्वांचीत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.
स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील महायोगी श्री अरविंद सभागृहात दि. ११ मार्च रोजी नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा येथील विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे , सत्कारमूर्ती नवनिर्वांचीत शिक्षक आमदार आमदार सुधाकर अडबाले आणि गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे ,
प्रमुख अतिथी माजी आमदार वामनराव चटप, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोकराव जिवतोडे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे आणि प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि लक्ष्मणराव गमे यांचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, “आम्हाला कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ कामांच्या आणि मतदारांच्या भरोशावर शिक्षक आमदार या पदावर पोहोचलो. प्रामाणिकपणे कार्य केल्यास सेवेचे चांगले फळ मिळते याची प्रचिती आली. माझा विजय हा आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. जरी मी शिक्षक आमदार असलो तरी मी शैक्षणिक क्षेत्रासोबतच शेतकऱ्यांच्या समस्यांवरही सभागृहात लढेल. जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहील ” असे विचार त्यांनी व्यक्त केले.
लक्ष्मणराव गमे यांनी सांगितले की, ” राष्ट्रसंतांचा गुरुकुंज आश्रम हा लोकशाही मार्गाने काम करत असतो. तेथील स्वच्छ व सुंदर परिसर पाहायला आपण यावे. जवळपास पस्तीस वर्षानंतर चंद्रपूरला सर्वाधिकारी हा सन्मान मिळाला आहे. घर तिथे ग्रामगीता वाचक ही संकल्पना राबविणार आहोत. आपण सगळ्यांनी या कामात सहभागी व्हावे ” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी परिसरातील अनेक संस्थांनी सत्कारमूर्तींचा सत्कार केला. या प्रसंगी जयंत टेमुर्डे, प्रा. धनराज आस्वले, अशोक पोफळे, विठ्ठल मांडवकर , गोपाल ठेंगणे यांच्यासह परिसरातील अनेक सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन डॉ.ज्योती राखुंडे, प्रास्तविक प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे आणि आभारप्रदर्शन प्रा. नरेंद्र लांबट यांनी केले.