गडचिरोली:शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व शेतीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राजकीय भेदभाव न करता एकत्रित येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते रविवारी 12 मार्च रोजी अहेरी येथील ग्राउंड येथे जय पेरसापेन बहुउद्देशीय आदिवासी गोंड समाज मंडळ तथा वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती महोत्सव, सल्ला गांगरा शक्तिपीठ स्थापना, कोयापुनेम प्रबोधन व आदिवासी बांधवांचे सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी उद्घाटनस्थानी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रोजा करपेत, माझी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, रामेश्वर बाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय तथा जिल्हाध्यक्ष शाईन हकीम, अहेरीचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, कोया पुणे प्रचारक राहुल कन्नाके, प्राध्यापक रमेश हलामी, प्रकाश गुडेल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना समाज जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत विकास शक्य नसून थोर महात्म्यांच्या आणि लोकनेत्यांच्या सन्मानासाठी एकत्रितपणे लढा देण्याची आवश्यकता असल्याचे मत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मांडले. एवढेच नव्हे तर,आपण वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्षात कार्य करीत असलो तरी समाज हितासाठी पक्षपात बाजूला सारून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक संघटित होणे काळाची गरज असल्याचे ठाम मत त्यांनी मांडले.
उद्घाटनीय स्थानावरून बोलताना राजे
अम्ब्रीशराव आत्राम यांनी कोयापुनेम संस्कृती ही प्राचीन व सभ्य संस्कृती असून इतर संस्कृती पेक्षा भिन्न आहे.त्यामुळे कोयापूनेम संस्कृती टिकविणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.याच वेळी त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात गोंडवानातून बुलंद आवाज करणारे स्वातंत्र्य सेनानी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकले.
तत्पूर्वी सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आ.धर्मराव बाबा आत्राम व राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याहस्ते सल्ला गांगरा शक्तीपीठ ला माल्यार्पण करून सामूहिक आदिवासी गीतांनी प्रार्थना करण्यात आले. यावेळी तब्बल 62 आदिवासी जोडते यांचे आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार राजपरिवार व हजारो संख्येच्या साक्षीने शाही ताटात सामूहिक विवाह संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप साडेमिक यांनी तर सूत्रसंचालन नारायण कुमरे यांनी केले तर आदित्य सडमेक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
काका-पुतणे एकाच मंचावर
वीर बाबुराव शेडमाके जयंती महोत्सवानिमित्त आदिवासी सामुहिक विवाह सोहळ्यात काका आमदार धर्मराव बाबा आत्राम व पुतणे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम बरीच वर्षानंतर एकाच मंचावर आल्याने स्थानिक अहेरीकरांची उत्सुकता वाढली होती. उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदात मोबाईल मध्ये छायाचित्र टिपत होते.