चंद्रपूर (आशिष घुमे ) : भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार यांच्या निवासस्थानी श्रीमदभागवताचार्य रामप्रियाजी (माई) यांनी आज सकाळी त्यांच्या अनुयायांसह सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा सह्याद्रीचा राखणदार चे वरिष्ठ संपादक डॉ.यशवंत घुमे, लोकमान्य विद्यालयातील शिक्षक शरद राजूरकर, मनिषा चंद्रकांतजी गुंडावार, धनश्री अमित गुंडावार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भागवतकथा वाचक रामप्रियाजी (माई) यांनी भद्रावती शहराविषयी माहिती जाणून घेतली व आध्यात्मिक विषयावर चर्चा केली.
रामप्रियाजी (माई) या अध्यात्म भास्कर आचार्य श्री सुधांशुजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या आहेत. त्या स्थानिक श्री. संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सवा निमित्त भद्रावती येथील श्री. संत गजानन महाराज मंदिर परिसरात भागवत ज्ञान सप्ताहा निमित्त आल्या आहेत. ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या भागवत सप्ताहात त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या प्रवचनाने भद्रावती शहरात भागवतमय वातावरण निर्माण झालेले आहे. आपल्या भागवतातून त्यांनी गौरी गणेश पूजन, भागवत महात्म्य, गोकर्ण कथा, वराह अवतार, कपिल आख्यान, ध्रुव चरित्र, जड भारत, अजामील उद्धार, प्रल्हाद चरित्र, नरसिंह अवतार, गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, श्रीराम अवतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव, बाललीला, माखनचोरी लिला, पुतना उद्धार, गोवर्धन लीला, छप्पन भोग, रासलीला, कंसवध, सुदामा चरित्र,परिक्षित मोक्ष इत्यादी विषयांवर सुमधुर भागवत केले आहे. दररोज सायंकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या श्रीमदभागवत ज्ञानयज्ञ सप्ताहात भद्रावती शहरातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. या भागवत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीचे अध्यक्ष उमाकांत गुंडावार, उपाध्यक्ष विजय डुकरे, हिरामण कोटगले, कार्याध्यक्ष बंडू दरेकर, संयोजक विजय डंभारे, कोषाध्यक्ष उल्हास भास्करवार, सचिव रमेश काळे, सहसचिव अनिल चटप, विनोद घोडे यांच्यासह अनेक मान्यवर विशेष परिश्रम घेत आहेत.