कारंजा (घा.)/धिरज कसारे :- प्रशासकीय सेवा परीक्षेला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सामोरे जात सध्या आलेल्या मोठ्या प्रमाणातील रोजगाराच्या संधीचा लाभ घ्या असे प्रतिपादन भाप्रसे सेवानिवृत्त व विद्यमान नागपूर,कोंकण विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी केले.
येथील मानवता विचार प्रतिष्ठाण व नारायणराव काळे स्मृति माॅडेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
मोठ्या प्रमाणात युवक व युवतींना नोकरीसाठी यावेळी संधी चालून आलेली आहे.आपआपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार स्पर्धा परीक्षा देता येते असेही ते म्हणाले.
प्रशासकीय सेवा परीक्षेची गुरूकील्ली या विषयावर अभय यावलकर व संजय नाथे यांचे व्याख्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्व. दादासाहेब काळे यांचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या व्याख्यानमालेचे दुसरे प्रमुख वक्ते रोजगार संघ नागपूरचे संस्थापक प्रा.संजय नाथे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले.स्पर्धा परीक्षेसाठी विविध माध्यमाचा उपयोग करता येतो.त्यासाठी भरपूर वाचन,सातत्य,प्रामाणिकपणा,जिद्द,चिकाटी,चर्चा करण्याची क्षमतेचा योग्य उपयोग करावा असे नाथे यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षेच्या विविध विषयाची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतरही विभागातर्फे रोजगाराच्या उपलब्ध झालेल्या संधी बद्दल मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.संजय धनवटे होते.प्रास्ताविकातून पाहूण्यांचा परिचय मानवता विचार प्रतिष्ठाणचे विलास वानखडे यांनी करून दिला.
यावेळी प्राचार्य डाॅ.संजय धनवटे यांचे हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन प्रमुख वक्ते अभय यावलकर व संजय नाथे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. संजय धनवटे यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन विलास वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मानवता विचार प्रतिष्ठान तर्फे कारंजा शहरात व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प याप्रसंगी विणण्यात आले.सूत्रसंचलन मोहिनी किनकरने केले.आभार प्रदर्शन मानवता विचार प्रतिष्ठानचे प्रेम महिले यांनी केले.नारायणराव काळे स्मृति माॅडेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे रोजगार मार्गदर्शन विभागाचे डाॅ. प्रा. विजय राघोर्ते व सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचार्यांनी यावेळी सहकार्य केले.महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील मुलेमुली यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.