भामरागड :- आज दि. 16 जानेवारी 2022 रोजी भामरागड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये कृषी विभागामार्फत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील शालेय विभागाच्या प्रमुख समीक्षा आमटे उपस्थित होत्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, पप्पुलवार, नायब तहसीलदार, स्वप्निल मगदूम, गटविकास अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी , वडलाकोंडा, गटशिक्षणाधिकारी, भाऊसाहेब लावंड, तंत्र अधिकारी अमोल नेटके, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा, माविम व उमेद मधील बचत गट, शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विविध पौष्टिक तृणधान्या चे नमुने सर्व उपस्थितांसाठी उपलब्ध करून छोटे खाणी प्रदर्शनी ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. मानवी आहारामध्ये पूर्वीच्या काळी स्थानिक स्तरावर येणारे वेगवेगळी तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोसरी / कोडो, वरई या तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश होता तथापि त्यानंतर हळूहळू या सर्व तृणधान्याची जागा गहू व भात हे दोन तृणधान्यानि घेतली व आता बहुतांश भागात गहू व भात हे दोनच तृणधान्ये खाली जातात. केवळ या दोनच धान्याच्या जास्तीत जास्त सेवनामुळे अनेक मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार याशिवाय अनेक नवीन प्रकारच्या व्याधी होत असल्याचे अलीकडे लक्षात आले आहे. याउलट पौष्टिक तृणधान्यांमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने खनिजे व जीवनसत्वे यांचा भरपूर समावेश असल्याने ही आरोग्यासाठी अत्यंत चांगले असतात याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. पौष्टिक तृणधान्य यांचे पोषण मूल्य तसेच याची आहारातील आवश्यकता याबाबतची माहिती प्रत्येक घराघरापर्यंत व प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी नियमित अंगणवाडी व शाळांमध्ये प्रबोधन करतानाच 26 जानेवारीला शाळांमध्ये प्रभात फेऱ्या काढून शाळा अंगणवाडी यांनी प्रचार प्रसिद्धी करावी असे यावेळी आवाहन करण्यात आले. अंगणवाडी मध्ये गरोदर महिला व बालकांसाठी दिल्या जात असलेला आहारात तसेच शालेय शिक्षण विभागातील मध्यान भोजन या मध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा, शासन स्तरावर पुरवठा होणाऱ्या मध्यान भोजन व आहार विषयक योजनांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचा समावेश व्हावा याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे इत्यादी काही सूचना यावेळी आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना समीक्षा आमटे यांनी हेमलकसा प्रकल्पात मागील दोन-तीन वर्षापासून पौष्टिक तृणधान्याचा वापर आदिवासी कुटुंबातील शालेय मुलां च्या आहारामध्ये लोक बिरादरी प्रकल्प मार्फत करत असल्याबाबतची माहिती दिली. प्रकल्पामार्फत परिसरामध्ये नाचणी, राळा, कोडो इत्यादी पिकांची लागवड करण्यात येत असून नाचणी आंबील मुलांना दिल्याने त्यांचे पोषणामध्ये अत्यंत चांगले बदल बघायला मिळत असल्याबाबत ची माहिती त्यांनी दिली. संतुलित पद्धतीने आहार किती महत्त्वाचा आहे व सद्यस्थितीत त्यातल्या त्यात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश यामुळे कसे पोषणमूल्य वाढतील याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. व सगळ्या उपस्थितांना याच्या आहारातील वापरावर भर देण्याबाबत आवाहन केले. तसेच हे मिलेट प्रक्रिया करून त्यापासून धान्य मिळवणे अत्यंत जिकरीचे असल्याने याविषयीची मशिनरी उपलब्ध होणे गरजेचे असल्याबाबत त्यांच्या व्याख्यानातून प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री बसवराज मास्तोळी यांनी पौष्टिक तृणधान्य खालील क्षेत्र वाढीसाठी बियाणे व प्रक्रिया विषयक मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले. तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त सबंध वर्षभर आखून दिलेल्या कॅलेंडर प्रमाणे विविध कार्यक्रम सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आपापल्या भूमिका पार पाडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विशद करून त्याबाबत चा वापर लोकांमध्ये वाढावा याबाबत प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील चमू नीतू पेंदाम, गिरीश तुलावी, डेव्हिड पुंगाटी, सोमधी तलांडे, विमा प्रतिनिधी सुरज राऊत, हुसेन खान पठाण यांनी योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्र अधिकारी भाऊसाहेब लवांडे यांनी केले