महेश गुंडेटीवार/गडचिरोली:- महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात अजूनही मुख्य रस्ते नदी-नाल्यावर पूल नसल्याने दुर्गम भागात ॲम्बुलन्सची सुविधा पोहचू शकली नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही छत्तीसगड सीमेवर वसलेल्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गर्भवती महिलांना व रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. रुग्णांना व गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळावा या उदात्त हेतूने आदिवासी विकास विभागाने आता पुढाकार घेतला आहे. नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील आरोग्य ताफ्यात तीन बाईक ॲम्बुलन्स दाखल झाले असून त्याचे लोकार्पण १० जानेवारी रोजी भामरागड तालुका मुख्यालयात प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषणा चव्हाण, गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ भूषण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांचा समावेश होतो.ही दोन्ही तालुके नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या तालुक्यात अजूनही विकासाचा सूर्योदय झाला नाही. पावसाळ्यात तर नदी-नाल्यावर पूल नसल्याने बहुतांश भागाचा तालुका मुख्यालयाशी संपर्कच तुटतो.अश्या परिस्थितीत गरोदर माता व रुग्णांना जीव धोक्यात टाकून खाटेवर, खांद्यावर घेऊन तुडुंब भरलेल्या नदी-नाल्यातून प्रवास करावा लागतो. अश्या परिस्तिथीत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेल्याचे घटना घडल्या. अशा खडतर परिस्थितीमध्ये रुग्णांची ने-आण करण्यासाठी येथील प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत आरोग्य विभागाच्या ताफ्यात बाईक ॲम्बुलन्सचा समावेश केला आहे.तिन्ही बाईक ॲम्बुलन्स भामरागड तालुक्यासाठी वापरण्यात येणारी असल्याने अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागातील रुग्णांना आणि गरोदर मातांना उपचारासाठी आशेचे किरण दिसू लागले आहे.
भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावांचा समावेश असून मन्नेराजाराम, आरेवाडा आणि लाहेरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातून मन्नेराजाराम ५,आरेवाडा ७ आणि लाहेरी ९ असे एकूण २१ उपकेंद्र चालविले जातात.यातील बहुतांश उपकेंद्रे ही तालुका मुख्यालयपासून ३५ ते ४० किलोमीटरवर अंतरावर आहेत.शिवाय लगतच्या छत्तीसगड राज्यातील रुग्ण सुद्धा भामरागड तालुक्यात उपचारासाठी येतात. अश्यावेळी रुग्णांना व गरोदर मातांना जवळच्या उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करणे सोपे होणार आहे.
बाईक ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा
बाईक ॲम्बुलन्स मध्ये प्राथमिक उपचार पेटी आणि ऑक्सिजन सिलेंडर या व्यतिरिक्त मलेरिया,सर्पदंश आणि अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी मूलभूत औषधांसह वैद्यकीय किट असेल आणि या ॲम्बुलन्स मध्ये एक रुग्णासाठी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील रुग्णांची हेडसांड थांबणार आहे.
तालुक्यातील विसामुंडी,नेलगुंडा आणि पल्ली ही तीन उपकेंद्र अतिदुर्गम भागात असून या उपकेंद्रात समाविष्ट गावातील रुग्णांना,गरोदर मातांना या बाईक ॲम्बुलन्स चा फायदा होणार आहे.या भागातील रुग्णांना नजीकच्या उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स चा वापर केला जाणार आहे. बाईक ॲम्बुलन्स चालवण्यासाठी विनेश रामा मडावी विसामुंडी, विलास पांडुरंग आत्राम नेलगुंडा आणि चक्कर जालम बाकडा उपकेंद्र पल्ली यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
– शुभम गुप्ता,प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय,भामरागड