चंद्रपूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्यमान भारत योजना राबविली जात आहे.
या योजनेअंतर्गत रुग्णांना पाच लाखापर्यंत आरोग्य विम्याच्या माध्यमातून एकूण 1209 प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया मोफत दिल्या जातात. कोरपना तालुक्यात आयुष्यमान कार्डचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 34 हजार 238 आहे. त्यापैकी बाखर्डी गावातील आयुष्यमान भारत ई-गोल्डन कार्डचे एकूण पात्र लाभार्थी संख्या 560 इतके आहे. तसेच एकोडी गावातील आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे एकूण पात्र लाभार्थी संख्या 115 इतकी आहे. या सर्व लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले आहे. कोरपना तालुक्यातील बाखर्डी, एकोडी गावातील आयुष्यमान भारतचे उल्लेखनीय कामातून 100 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाखर्डी गावातील आशा स्वयंसेविका सुरेखा कडुकर, उज्वला मून, गटप्रवर्तक सविता जेणेकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर सुषमा वनकर तसेच एकोडी गावातील आशा स्वयंसेविका अलका दडांजे, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशोक लांजेकर, गटप्रवर्तक रेखा शिंदेकर, तालुका व्यवस्थापक अमोल साखरकर, तालुका समूह संघटक संदीप कांबळे यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोरपणा तालुक्यातील बाखर्डी व एकोडी गावाचा आदर्श ठेवून जिल्ह्यातील गावांनी 26 जानेवारीपर्यंत आयुष्यमान भारत गोल्डन ई-कार्डचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी केले आहे.