गडचिरोली:- सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रात रोड सर्वे करायला गेलेल्या वनकर्मचाऱ्यांना नक्षल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना 5 जानेवारी (गुरुवारला) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने सिरोंचा वनविभागात एकच खळबळ उडाली असून वन कर्मचारी मोठ्या दहशतीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार सिरोंचा वनविभागातील कमलापूर वनपरिक्षेत्रात येत असलेल्या आशा ते कोरेपल्ली रोड साठी सर्वे करायला 5 जानेवारी रोजी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोयर आणि क्षेत्र सहाय्यक,वन रक्षक, सर्वेअर असे एकूण 8 जण वन विभागाचे आणि इतर असे तब्बल 20 जण या परिसरात गेले होते. सायंकाळच्या सुमारास काम करून परत येत असताना नैनेर ते कपावंचा दरम्यान ही घटना घडली.विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी कर्मचाऱ्याकडे असलेले मोबाईल आणि काही वनमजुरांचे सिम कार्ड घेतल्याची माहिती आहे एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांचे 5 दुचाकी वाहने जाळल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी परिस्थिती जाणून घेत एफ आय आर दाखल केले आहे.
23 डिसेंबर रोजी याच भागातील इंद्रावती नदीच्या पलीकडे छत्तीसगड राज्याच्या हद्दीत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 कमांडोंनी दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर जिल्ह्यात नक्षल्यांकडून बॅनरबाजी, वाहनांची जाळपोळ तसेच वन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कमलापूर वनपरिक्षेत्रातील बहुतांश भाग हा अतिदुर्ग आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे हे विशेष.
———————
रोड साठी सर्वे करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना मारहाण करून 5 वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. याबाबत काल एफआयआर दाखल केले असून कर्मचाऱ्यांची प्राथमिक उपचार करण्यात आली आहे.
पूनम पाटे, उपवनसंरक्षक वनविभाग सिरोंचा