गडचिरोली: जिल्ह्यात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला असून त्याला जेरबंद करण्याची मागणी सुरू असतानाच अमिर्झा परिसरातील जंगलात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे वन विभागासह तालुक्यात खळबळ माजली आहे. या बछड्यांचा मृत्यू नैसर्गिक की दुसऱ्या वाघाच्या हल्ल्यात झाला. यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली वनविभागांतर्गत येणाऱ्या अमिर्झा परिसरात असलेल्या नरभक्षक वाघासोबत चार लहान बछडे असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासोबतच पिल्लांना जेरबंद करण्याची मंजुरी वनविभागाने वरिष्ठ कार्यालयाकडून मागीतली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडून तशी मंजुरी मिळाल्याने गडचिरोली वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. याचदरम्यान त्याच परिसरात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. एवढेच नव्हे त्याचे काही अवयव आढळून आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनुवटीचा भाग व अन्य एक अवयव आढळून आल्याचे सांगितले जात आहे. यासह यापूर्वी एक बछडा३ जानेवारीला मृतावस्थेत आढळून आला होता तर शुक्रवार, ६ जानेवारीला दुसऱ्या बछड्याचे काही अवयव आढळून आले आहे. यामुळे या बछड्यांचा नैसर्गिक मृत्यू की अन्य काही कारणाने मृत्यू झाला. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला, याबाबीला वनविभागाने दुजोरा दिला असून. या दोनही बछड्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर आढळून आले आहे. असे असले तरी त्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. या मृत पिल्लांचे अवयव वनविभाने ताब्यात घेतले असून त्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.