गडचिरोली:-जिल्ह्यात नक्षल्यांच्या कारवाया कमी करण्यात पोलीस दलास मोठं यश मिळालं आहे.मात्र,आता नक्षल समर्थक सक्रिय झाल्याचे एका घटनेत उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अहेरी अंतर्गत येत असलेल्या उप पोलीस स्टेशन पेरमीली हदीतील पेरमिली ते भामरागड रस्त्यावरील चंद्रा गावाजवळ सुरू असलेल्या बांडीया नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ७० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यां तब्बल १० नक्षल समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.
आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील बांडीया नदीवर पुलाचे काम सुरू आहे.एका कंपनीकडून सदर काम केले जात आहे.या कामावर दिवानजी काम पाहत असून त्यांना सदर रकमेची मागणी करण्यात आली आहे.अशी तक्रार कंपनीचे दिवानजी यांनी पेरमिली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे दोन अनोळखी बंदुकधारी व्यक्तींनी त्यांचे कामाच्या साईडवरुन झोपलेल्या ठिकानावरुन उठवुन त्यांना रात्री जंगल परीसरात नेले व त्या ठीकानी त्यांचे अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवुन बांडीया पुलाचे काम पुर्ण करायचे असेल तर तीन दिवसात ७० लाख रुपये दया अन्यथा तुमच्या कंपनीच्या साहीत्याची जाळपोळ करून तुम्हाला जिवे मारु अशी धमकी दिली होती.सदर घटनास्थळी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले १० ते १२ इसम आजुबाजुला उभे होते व ते नक्षलवादयांसारखे दिसत होते अशी माहिती पोलीस स्टेशन पेरमीली येथे तक्रारदाराने दिली.या तक्रारीवरून पेरमिली येथे गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तपास केले असता नक्षल समर्थकांनी बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.यातील सर्व नक्षल समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.
या नक्षल समर्थकांकडून दोन भरमारसह काही साहित्य जप्त केले असून सदर आरोपींचा इतर अशाचप्रकारच्या गुन्हयांमध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे,अप्पर पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि अजिंक्य जाधव, पोउपनि दिपक सोनुने, पोहेकॉ रामहरी जांबुळे, पोहेकॉ रविंद्र बोढे, पोकॉ राहुल खार्डे, पोकॉ महेश दुर्गे, पो कॉ प्रशांत मेश्राम, पोकॉ मधुकर आत्राम, पो कॉ विवेक सिडाम, पो कॉ राकेश उरवेते, पो कॉ ब्रिजेश सिडाम यांनी पार पडली आहे.
————————————————–
शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांनी अशा खंडणी मागणाऱ्या पासून सावध राहावे व पोलीस दलाची मदत घ्यावी. नक्षलवाद्यांच्या वतीने फसवणूक करणाऱ्या किंवा नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्यांची गैर केली जाणार नाही. तसेच नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायावर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे.
-निलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली