अहेरी:- समाज आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज असून शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.त्यामुळे स्वयंरोजगारातुन येथील महिला सक्षम होणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.अहेरी तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत तर्फे गावातील महिलांना माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी महागाव (बु) चे सरपंच पुष्पा मडावी,उपसरपंच संजय अलोने,भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री,जेष्ठ नागरिक वेंकटी वेलादी, सदाशिव गर्गम, सामाजिक कार्यकर्ते विकास उईके,महादेव गंगा वेलादी,श्रीनिवास अलोने,चंद्राजी रामटेके,शंकर दहागावकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना महागाव ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगाच्या निधीचा सदुपयोग केला असून गावातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना बळकट करण्याचा निर्णयाचा त्यांनी स्वागत केले.एवढेच नव्हेतर प्रत्येक ग्रामपंचायतने असाच निर्णय घेतल्यास गावातील महिलांना नक्कीच रोजगार मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.पूर्वी स्त्रिया पुरुषांवर अवलंबून राहत होत्या.आज ती परिस्थिती राहिली नाही. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. शहरातील महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला थोडंफार मागे असलेतरी त्या कमी नाहीत. मात्र, खेड्यापाड्यातील महिलांना शासकीय योजनांची योग्य माहिती नसते.गावातील सुशिक्षित तरुणांनी त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करावी.असेही त्यांनी आवाहन केले.
खेड्यापाड्यात अनेक महिलांना उत्तम शिवणकाम येते.मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्याकडे शिवणयंत्र नसल्याने या क्षेत्राकडे त्या पाठ फिरवत असतात. मात्र, अशा गरजू महिलांसाठी महागाव ग्रामपंचायतने पुढाकार घेतल्याने आता या महिलांचा स्वप्न पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.गावात इतरही गरजू महिला असतील आपण सदैव त्यांच्या पाठीशी असून त्यांना पाहिजे ती मदत देण्यास तत्पर असल्याचा विश्वासही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.