मारेगांव : दिवाळी हा श्रीमंतांचा सण अशी काहिसा समज प्रचलित आहे. दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हा साजरा करता येत नाही. त्यामुळे समाजातील गरीबांची दिवाळी अंधारातच जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी बीड येथे कार्यरत असलेले समाजकल्याण उपायुक्त डॉ.सचीन मडावी (मूळ गाव मारेगांव) यांनी आपल्या सहपरिवार व आप्तांसह मारेगाव तालुक्यातील आदिवासी पोडावर जाऊन साजरी केली.आज भाऊबीजेला तेथील गरीब आदिवासींना फराळ व भेटवस्तू देत हा सण साजरा केला गेला.
ही प्रथा मागील सहा वर्षापासून समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी यांनी बिरसा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे या भाऊबिजेला त्यांनी बिहाडी पोड ( कोलाम पोड) येथे आदिवासी ग्रामस्थां सोबत भेटवस्तू व फराळाचे पदार्थ देऊन साजरी केली. यावेळी डॉ.सचीन यांचेसह बिरसा फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर मडावी यांना ग्रामस्थ महिलांनी ओवाळले.
सुरूवातीला गावातून वाजत गाजत आदिवासी भाषेतील गाण्यांच्या तालावर पारंपारिक पध्दतीने आदिवासी नृत्य करीत स्त्री पुरुषांनी मिरवणूक काढली. गावकऱ्यांनी दारोदारी रांगोळ्या काढून रस्ते सजवले होते.फटाक्यांची आतिषबाजी व समूह नृत्य करीत शोभायात्रा गावातील चावडीवर पोहचली. यावेळी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरसा मुंडा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शंकर मडावी होते. प्रमुख उपस्थितीतांमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष प्रमोद बोरीकर , क्रांतिवीर शामा दादा कोलाम आदिवासी संघटनेचे अध्यक्ष राहुल आत्राम, यवतमाळ येथील शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते तुषार आत्राम, सह्याद्रीचा राखणदार चे वरिष्ठ संपादक डॉ. यशवंत घुमे, सरपंच टेकाम, सरपंच मारोती गौरकार, तालुका अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष आनंद मसराम, पैकुजी आत्राम, शेखर वेटे, गणुजी थेरे,अरविंद वखनोर, , तसेच बिहाडी पोड गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तुळशीराम कुमरे आभारप्रदर्शन भास्कर टेकाम यांनी केले. गावातील महिलांना भाऊबीज निम्मित दिवाळी फराळ , किराणा सामान आणि सॅनेटरी नॅपकिन पॅकव शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.