वरोरा :
जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष सतत तीव्र रुप धारण करीत आहे. या संघर्षातून होणारी प्राणहानी अत्यंत चिंताजनक आहे. आधीच ग्रामीण क्षेत्रात आतिवृष्टीमुळे सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने शेतकरी व शेतमजूर त्रस्त आहेत. यातच वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या चिंतेत आणखी भर पडत आहे. यामुळे प्रशासनाने वन्यप्राणी व मानव संघर्ष रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी केली आहे.
आज दि. २८ ऑक्टोंबर रोजी सह्याद्रीचा राखणदार सोबत अनौपचारीक वार्तालाप करतांना सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे बोलत होते. याप्रसंगी रविंद्र शिंदे म्हणाले की, ताडोबा राष्ट्रीय उद्यान क्षेत्राच्या सिमेलगतची गावे, इरई धरण परिसरातील गावे, चांदा आयुध निर्माणी वसाहत, कर्नाटका एम्टा खाण परिसरातील झुडपी जंगल, चंदनखेडा, चोरा, माजरी, चारगाव आदी ठिकाणी असलेला वन्यप्राण्यांचा वावर येथील जनतेसाठी चिंतेची बाब ठरली आहे. विशेषता वाघ व बिबट यांच्यापासून प्राणहानी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वेकोलि परीसरात निर्माण झालेल्या कृत्रीम जंगल व टेकडयात वाघ व बिबट यांचा वावर वाढला आहे. अलीकडेच माजरी वस्तीत वाघाने एका व्यक्तीचा बळी घेतला. चांदा आयुध निर्माणी वसाहतीत सुध्दा वारंवार वाघ व बिबट द्दष्टीस पडते. किरकोळ घटना घडत असतात. यामुळे मानव व जनावरांच्या जिवितास धोका पोहचत आहे. याशिवाय रानडूकर, कोल्हे, रोही या सारख्या वन्य प्राण्यांमुळे सुध्दा शेत पिकांचे नुकसान होतात.
प्रशासनाने वाघ व बिबट यांना इतरत्र स्थलांतरीत करावे. तसेच या वन्यप्राण्यापासून जिवित हानी होणार नाही. यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. जंगलव्याप्त परिसरात सौर कुंपण योजना राबवावी. सोबतच वन्यप्राण्यामुळे नुकसान झालेल्यांना तातडीची भरीव मदत देण्यात यावी, अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी यावेळी केली आहे.