कोरची :- राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यात पशु धनामध्ये लम्पी आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रोगाला घाबरून न जाता पशुपालकांनी सतर्क राहून रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन मसेली येथील अतिरिक्त पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण एस जाधव यांनी केले आहे.
कोरची तालुक्यातील मसेली पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत बोदालदंड येथे २३ सप्टेंबरला लम्पी आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. येथील नागरिकांच्या जनावरांच्या गोठ्यावर जाऊन गोठा साफसफाई व औषधपचार फवारणीची प्रात्यक्षिके करण्यात आली. तसेच गावातील ६० जणांचा गाय-बैलांचा गोठ्यात औषधी फवारणी सुद्धा करण्यात आली आहे. सध्या कोरची तालुक्यात लम्पी आजाराचे एकही गाय, बैल नाही परंतु पूर्व काळजी घेण्याची गरज असल्याने गोठ्यात फवारणी व स्वच्छता ठेवणेबाबद पशुविभागाकडून जनजागृती करणे सुरू आहे.
लम्पी हा रोग गाय, बैल यांच्यात जास्त प्रमाणात आढळतो. अंगावर गाठी येणे पायावर व पोळीवर सूज येणे, डोळ्यातून व नाकातून स्राव वाहने, दुग्ध उत्पादनात घट होणे, आदी या रोगाची लक्षणे आहेत. आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून दूर बांधावे, गोठा स्वच्छ करून कडूलिंबाच्या पानाचा धूर करावा, जनावरांच्या अंगावरील कीटक व गोमाशा गोचीड चिलटे इत्यादींच्या नियंत्रणासाठी एक लिटर पाण्यात ४० मिली करंजी तेल, ४० मिली नीम तेल आणि ४० ग्राम साबण याचे एकत्रित मिश्रण करून जनावरांच्या अंगावर तसेच गोठ्यात फवारणी करावी.
अशा विविध घरगुती उपाय योजनांचा सल्लाही डॉ. किरण जाधव यांनी पशुपालकांना दिला आहे. जनावरे आजारी असल्याचे लक्षात आल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन यावे वेळीच उपचार झाल्यास हा रोग बरा होण्यास मदत होते असे आवाहन डॉ जाधव यांनी जनजागृती कार्यक्रमातून केला आहे.