गोंडपिपरी:-सुरजागड लोहखाण येथील लोह दगडांच्या जड वाहतूकीमुळे विविध समस्या निर्माण झाले असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.निर्माण झालेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करा.अन्यथा 23 सप्टेंबर रोजी रास्तारोको करण्याचा इशारा गोंडपीपरी तालुक्यातील विविध पक्षांनी दिला आहे.
सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू झाल्याने चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावरून खनिज वाहतुकीसाठी गोंडपिपरी वरून दररोज शेकडो जड वाहनाद्वारे वाहतूक सुरू आहे.मात्र वाहनचालकांचे वाहनावर कोणतेच नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. सुरजागड लोकप्रकल्पाने परिसरातील हजारो लोकांचे कल्याण होईल, अशी अपेक्षा होती. पण आता हाच प्रकल्प नागरिकांच्या जिवावर बेतला आहे.
अनियंत्रित वाहतूक, नशेखोर वाहनचालक, अन् प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे. सुरजागड प्रकल्पाने गोंडपिपरी तालुक्यातील अनेक तरुणांच्या वाट्याला अपंगत्व आणलेय. अनेकांची घर फुटली. मार्गावरील निवास्यांना कमालीची भिती आहे.
गोंडपिपरीवरून बायपास काढावा, नशेखोर वाहनचालकांची तपासणी करावी,वाहनचालकांचा परवाना तपासावा,ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या कार्यवाया कराव्या,नवेगाव (वाघाडे) टोल नाका लवकरात लवकर सुरू करावा,कंपनी मार्फत रस्त्यावर खाजगी सुरक्षा रक्षक देण्यात यावे,वर्दळीच्या ठिकाणी पोलीस ब्यारिकेट्स लावावे,ओवरलोड वाहतूक बंद करावी आदी मागण्यांचे निवेदन ठाणेदार जीवन राजगुरू यांना देण्यात आले.यासंदर्भात पाच दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा, शिवसेना पक्षासह धर्मवीर प्रतिष्टान,बौद्ध महासभा,जय मातादी क्रिडा मंडळ, व्यापारी संघटने तर्फे प्रशासनाला दिला आहे.