कोरची :- शिक्षणाचा दर्जा उंच व्हावा व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी याकरिता शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सदर योजनेचे उपक्रम कोरची तालुक्यात सुद्धा राबविण्यात येत आहे. परंतु बहुतेक शाळेत सदर उपक्रम व शिक्षण दिले जात आहे जर्जर झालेल्या इमारतीत. किंवा अपुऱ्या जागेत. यामुळे विद्यार्थ्यांना अळचनीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेतकाठी येथे वर्ग १ ते ७ पर्यंत असून विद्यार्थी पटसंख्या १३२ आहे व सुरक्षित वर्गखोली दोनच असल्यामुळे वर्ग १ ते ५ एकाच खोलीत व वर्ग सहा ते सात एका खोलीत शिकवले जात असल्यामुळे वर्ग पाचचा विद्यार्थी पहिली चे धडे घेत आहेत व वर्ग पहिली चा विद्यार्थी पाचवीचे शिक्षण घेत आहेत का असे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेतकाठी येथील दोन इमारत निर्लेखनाच्या अवस्थेत असून दोन इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे या शाळेला जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व अभियंता यांनी भेट देऊनही अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. या शाळेला नवीन इमारत देण्यात यावी व दोन इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी याकरिता कित्येकदा निवेदन सुद्धा देण्यात आले परंतु परिस्थिती अजूनही जैसे थे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील बहुतेक शाळेची असून याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जर्जर शाळेत लहान चिमुकले व शिक्षक आपला जीव मुठीत घालून शाळेत शिक्षणाचे धडे घेत असल्याचे दिसून येत आहे.