गडचिरोली:- सुरजागड लोहखान येथील लोह दगडांच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होण्यासोबतच प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या वाढत असल्याने या व आदी समस्यांचे निराकरण करण्याच्या मागण्यांना घेऊन आलापल्ली,नागेपल्ली येथील व्यापारी संघटनेने १२ सप्टेंबर पासून बेमुदत मार्केट बंद ठेवला होता.१४ सप्टेंबर रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आलापल्ली येथील वन विभागाच्या विश्रामगृहात व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन येत्या १६ सप्टेंबर रोजी जिल्हा मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष विविध विभागाचे अधिकारी आणि लोहखाणीच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासनानंतर व्यापारी संघटनेने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत मार्केट बंद ला तूर्त स्थगिती दिली आहे.
१४ सप्टेंबर रोजी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुरुवातीला व्यापारी संघटनेच्या समस्या जाणून घेतल्या. प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली.त्यानंतर खासदारांनी आष्टी ते आलापल्ली आणि आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर असलेली निधी,टेंडर झाल्यावर आलेल्या अडचणी आणि आदी विषय समजावून सांगितले.
मात्र, बायपास रस्ता तीन महिन्यात तयार करावा,बायपास रस्ता होईपर्यंत सुरजागड येथील ट्रक रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवावे, सर्व वाहने क्षमतेनुसार भरावे एतापल्ली ते आष्टी पर्यंत रस्ता त्यांच्या वाहनांचे लोड सांभाळू शकेल असा मजबुतीकरण तात्काळ करावे या प्रमुख चार मागण्यावर व्यापारी संघटना ठाम होती.अखेर १६ तारखेला या प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार आणि आमदार स्वतः पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यावर व्यापारी संघटनेने बेमुदत बंद ला तूर्त स्थगिती दिली.मात्र,समस्यांचे निराकरण न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपात बेमुदत बंद ठेवणार असल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले.
अखेर तीन दिवसानंतर व्यापारी आपापले प्रतिष्ठान सुरू करणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.यावेळी झालेल्या बैठकीत आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,व्यापारी संघटनेचे शिष्टमंडळ व आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.