वरोरा-भद्रावती तालुक्यात दुसऱ्यांदा पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता; ट्रस्ट तर्फे पूरग्रस्त गावात मदतकार्य सुरु
भद्रावती :गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. त्यात वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. वेकोलीच्या ढिगाऱ्यामुळे बॅक वाटरचा त्रास गावाशेजारी झाला आहे. गावात आवागमन होणारे मार्ग पाण्याखाली आले आहे. परिणामी नदी काठावरील गावात दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अशातच नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाला सहकार्य करावे, आरोग्याची काळजी घ्यावी, कोणत्याही मदतीकरीता ट्रस्ट सोबत संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांनी केले आहे.
पुराने वेढा घातलेल्या गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजारांची साथ सुरु झाली आहे. रुग्णांमध्ये वाढ होते आहे. याची दखल घेवून ट्रस्ट मार्फत रुग्णवाहीकेद्वारे रुग्णांना रुग्णालयात हलविल्या जात आहे. प्रशासनावर विश्वास ठेवून जीव धोक्यात न घालता गाव सोडून सुरक्षित स्थळी यावे. याकरीता स्थानिक भद्रावती येथे निवास व्यवस्था ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे. स्थानिक श्री. मंगल कार्यालयात पूरग्रस्तांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. भोजन, शुद्ध पाणी पुरवठा सुरु आहे. पिपरी येथील पूरग्रस्तांसाठी भोजन व्यवस्था ढोरवासा येथे करण्यात येत आहे.
तालुक्यातील माजरी, पाटाळा, थोराणा, मनगाव, राळेगाव, नागलोन, पळसगाव, माजरी वस्ती माजरी कॉलरी या भागात पुराचे पाणी शिरले आहे. सध्या वणी-वरोरा-नागपूर मार्ग, माजरी-कोढा-भद्रावती, पळसगाव-कुचना-माजरी, देऊळवाडा-भद्रावती, चालबर्डी-कोंढा-भद्रावती यासह अन्य मार्ग बंद आहे. वर्धा नदी, शिरणा नदी, कोंढा नाला तुडुंब भरला आहे. अप्पर वर्धा व ईरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या होणाऱ्या पावसामुळे वर्धा नदी दुफळी भरून वाहत आहे. अनेक नाल्यांना भरती आली असून, नदीलगतच्या शेती पाण्याखाली गेली आहे. अशावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगून वेळीच सुरक्षित स्थळी यावे. पूर ओसरेपर्यंत त्यांच्या संपूर्ण निवास व भोजनाची व्यवस्था ट्रस्ट करेल, आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.