नागपूर :- कोरपना व जिवती तालुक्यातील निसर्गरम्य निर्मित धबधबे व हिरवळीने परिपूर्ण असलेल्या या पर्यटन स्थळाचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगार निर्मिती व पर्यटन तालुके विकसित होईल. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम धरण, घाटराई देवस्थान, सावलहिरा येथील भिमलकुंड धबधबा, भस्म नागाची खोरी व धबधबे,जांभूळधरा येथे सात धबधबे, उमरहिरा येथे दोन धबधबे, मेहंदी येथे बोदबोदी धबधबा, जेवरा येथे खडक्या धबधबा, टांगळा धबधबा, घाटराई धबधबा इ.धबधब्यांनी परिपूर्ण आहे
जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ला, सिंगारपठार धबधबा, चिखली धबधबा, नदप्पा धबधबा आदी पर्यटन स्थळे आहे. यातील मानिकगड किल्ला,पकडीगुद्दम धरण यांना पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला आहे.
निसर्ग संपन्न असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकासापासून अद्यापही वंचितच आहे. त्यामुळे दोन्ही तालुके पर्यटन तालुके म्हणून घोषित करून पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.एकीकडे माणिकगडचे उंच उंच पहाड तर दुसरीकडे वैनगंगा, वर्धा नदीचे निर्मल सान्निध्य लाभलेला हा परिसर पावसाळी पर्यटनासाठी सर्वदूर परिचित आहे. मात्र माणिकगड किल्ला वगळता एकाही स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला नाही.यामध्ये वनसडी, पारडी येथील निजाम कालीन इन्स्पेक्शन बंगले, कोळशी बु. येथील निजामकालीन नाका, शेरज बु. येथील पोलीस ठाण्याची वास्तू, रूपापेठ, दुर्गाडी, चनई येथील गोंडकालीन गढी, कारवाही येथील गुफा, शंकरलोधी येथील गुफा आदी स्थळेही पर्यटनासाठी चांगली आहेत.
विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प माणिकगड पहाडाच्या अगदी लगत असल्याने, हा संपूर्ण भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास केल्यास येथील पर्यटन फुलून विकास साधला जाईल. स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या माध्यमातून शासनालाही पर्यटनातून महसूल प्राप्त होईल.करिता सदर तालुक्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास पुर्व विदर्भातील पर्यटनाला वाव मिळेल व विदर्भाचा विकास होईल.करिता या पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटन स्थळाला चालना देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या विभागीय प्रवक्ता व पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक प्रा. शिल्पा बोडखे यांनी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे जी यांना पत्राद्वारे केली आहे..