भद्रावती:- तालुक्यातील चारगाव परिसरात बंद पडलेला कोळसा खाणीचे झुडपे व झाडे वाढून हा संपूर्ण परिसर जंगलसदृश्य झाला आहे. यात वाघासह रानडुकरे, रोही तथा इतर वन्य प्राण्यांनी आसरा घेतल्यामुळे चारगाव येथील गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्याबरोबरच हे वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. ही समस्या लक्षात घेऊन वाघांचा व इतर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी चारगाव ग्रामपंचायत तर्फे एका निवेदनाद्वारे भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या गावातील खाणी बंद पडल्यामुळे या भागात जंगल निर्माण झाले आहे खाणीतील मुबलक पाणी व या भागात असलेल्या वन्य प्राण्यांमुळे या ठिकाणी वाघांनी वास्तव्य केले आहे .या वाघांची संख्या वाढून ती चार झाले आहे. या वाघांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांना मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेकांना या वाघांचे दर्शन होत असल्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी वनविभागाला अनेकदा निवेदन देण्यात आले मात्र यावर अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याआधी या परिसरातील वाघांचा व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.