चंद्रपूर : संपूर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्याप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील मानवी जीवन विस्कळीत झाले आहे, त्या प्रमाणेच शेतीशी निगळीत व शेतकऱ्यांना शेतीपूरक जनावरे यांचीही वाताहत झाली आहे. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून जनावरांच्या उपचाराकरिता तपासणी शिबिर, औषधी व जनावरांचे खाद्य (कडबा-कुटार) तथा अन्य आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदनातून केली आहे.
मागील महिना भरापासून ऐन शेतीच्या हंगामात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतपिक खरवडून गेली. सोबतच शेतीपूरक जनावरे, उदा., गाय, बैल, म्हैस, बकरी, कुत्रा, आदींवर रोगराई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, तरी या प्राण्यांच्या उपचाराची शिबिरे ग्रामीण भागात लावण्यात येवून औषध पुरवठा करावा. तथा या जनावरांना आवश्यक खाद्य पुरवठा करावा, अशी मागणी आहे. याबाबतच्या सूचना वरोरा तथा भद्रावती येथील तहसीलदार साहेबांना द्याव्या, असेही म्हणण्यात आले आहे.
गाय, बैल, म्हैस ही शेतीसाठी आवश्यक जनावरे आहेत. व त्यांच्यावर भुकेचे संकट ओढविले आहे. या पूर परिस्थितीत जर या जनावरांची क्षती झाल्यास, शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे होईल. या जनावरांशिवाय शेती करणे कठीण होईल. जोडधंदा कोलमडून पडेल. म्हणून शेतकरी हितासाठी या पाळीव प्राण्यांची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा वरोरा व भद्रावती या दोन्ही तालुक्यात पूरग्रस्तांना निवारा, भोजन व्यवस्था करीत आहे, पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न ट्रस्ट चे कार्यकर्ते करीत आहेत. सोबतच पाळीव जनावरांना वाताहत होवू नये करीता ताबडतोब खाद्य पुरवठा करावा, अशी मागणी ट्रस्ट तर्फे रवि शिंदे यांनी लावून धरली आहे.