तलाठ्यांकडून पंचनामे सुरू
वरोरा : तलावाचे सोडलेले पाणी घरात घुसून नुकसान झालेल्या नागरिकांची मदत करण्यास नगरपालिका प्रशासनाने नकार दिल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे मदतीला धावून आले. त्यांनी लगेच उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना आज मंगळवार दि १९ जुलै रोजी निवेदन देऊन पूर पुडीतांना तातडीने मदत करण्याची मागणी केली.
यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तलाठ्यांनी पंचनामे व अहवाल तयार करणे सुरू केल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरातील गांधीसागर तलाव पूर्ण भरल्याने तलावात येणारे पाणी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिका प्रशासनाने राजीव गांधी वार्डाकडे वळविलेलेल. परिणामी सदर पाणी सखल भागातील नागरिकांच्या घरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. संबंधित नागरिकांनी याबाबत नगरपालिका प्रशासनाला जाब विचारून मदतीची मागणी केली.परंतु त्यांनी नकार दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यानंतर नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांना मदती करिता साकडे घातले. तेव्हा त्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्याकडे पीडितांसमक्ष निवेदन देऊन मदतीची मागणी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम आणि उपशहर प्रमुख गजानन पंधरे उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तलाठ्यांना ताबडतोब पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पंचनाम्यानंतर सर्व नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपये प्रति कुटुंब मदत दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या प्रयत्नामुळे नवीन वस्तीतील पूर पीडितांना मदत होणार असल्याने पीडितांनी समाधान व्यक्त केले आहे.