वरोरा :– वाराणसी दौऱ्याहून परतत असतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी खांबाडा मार्गे थेट वरोरा तालुक्यातील पूरप्रभावित दिंडोरा, बाम्बर्डा, सोइट या गावांना भेटी देऊन पुरप्रभावित ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी व तक्रारी ऐकून घेतल्या. पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतपिकांची व प्रभावित घरांची सुद्धा त्यांनी पाहणी केली. या परिसरात बचाव कार्य करणाऱ्या SDRF चमूशी संवाद साधत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या सर्व गावातील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्यानंतर त्यांच्या राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल श्री अहीर यांनी रचना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करीत आभार मानले. यावेळी अहीर यांच्यासमवेत भाजयुमो चे प्रदेश सचिव करण देवतळे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, विजय मोकाशी, शेखर चौधरी, सुधीर भामट, बाळू भोयर यांचेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.