चंद्रपूर :-गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणा-या वेकोलि व महाऔष्णीक विद्युत केंद्राशी संबंधित विषयांकरिता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज आभासी बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भटाळी गावाबाहेर वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे यावर्षी पुरस्थिती निर्माण झाली व अनेक घरांमध्ये पाणी गेले. ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. वेकोलि ने त्यावर पक्का नाला बांधून पाणी नदीकडे वळते करावे व ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी वेकोलि अधिका-यांना दिले. त्याचबरोबर भटाळी गावाचे पुनर्वसन ताबडतोब करावे असेही त्यांनी सांगीतले. तसेच ओव्हरबर्डनमुळे चांदसुर्ला गावातील घरांमध्ये व शेतीत पाणी घुसले ज्याने तेथील नागरिकांचे नुकसान झाले. तेथेही नाल्याचे बांधकाम करणा-याचे निर्देश त्यांनी वेकोलि अधिका-यांना दिले. चंद्रपूर शहरात डीआरसी जवळ असणारी हाय व्हॉटेज लाईन भुमीगत करावी अशी मागणी एका पदाधिका-याने केली. ज्यावर आ. मुनगंटीवार यांनी पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
महाऔष्णीक विद्युत केंद्राने दरवर्षी नाल्याच्या साईडला असलेली जाळी काढली होती. ज्यामुळे कचरा व पाणी ताबडतोब निघण्यास मदत झाली. परंतु यावर्षी ही जाळी न काढल्यामुळे दुर्गापूर गावामध्ये व वेकोलि वसाहतीमध्ये पाणी जमा झाले. ज्याने लोकांचे नुकसान झाले. ही जाळी ताबडतोब काढण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. त्याचबरोबर द्वारकानगरीत नाला बांधकाम करण्यासंदर्भात तेथील लोकप्रतिनिधींबरोबर प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करावी व आवश्यकतेनुसार नाला बांधून द्यावा, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे रस्ते सीमेटचे करावे, जेणेकरून नागरिकांना रस्ते खराब होण्याचा त्रास होणार नाही. वेकोलि ने सर्व रस्त्यांवरील कचरा, माती ताबडतोब साफ करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. वेकोलि जे रस्ते स्वतः करू शकत नसेल त्यांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देवून त्यांच्याकडून करवून घ्यावी. वेकोलि व महाऔष्णीक विद्युत केंद्राने नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्या, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.
बैठकीला भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महाऔष्णीक विद्युत केंद्राचे कार्यकारी निदेशक पंकज सपाटे व त्यांचे अधिकारी, चंद्रपूर वेकोलिचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. साबीर व त्यांचे अधिकारी, महानगर उपाध्यक्ष रामपाल सिह, विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, शांताराम चौखे, हनुमान काकडे, रोशनी खान, राकेश गौरकार, सुभाष गौरकार, सुभाष कासनगोट्टूवार, शिला चव्हाण, सुनिल बरीयेकर, अंजली घोटेकर, अनिल डोंगरे, श्रीनिवास जंगमवार, संजय यादव, मदन चिवंडे, उपस्थित होते.