कोरची :- कोरची तालुका मुख्यालापासून ३५ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या कोटगुलसह या क्षेत्रातील ४० गावातील विद्युत पुरवठा मागील पाच ते सहा दिवसापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना खूप त्रास होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून रात्रोला अनेक सरपटणाऱ्या जीव जंतूंची घरात शिरण्याची भीती नागरिकांना झाली आहे यामुळे एखाद्या ग्रामीण कुटुंबातील सदस्याला विषारी साप, विंचू चावल्यास आणि त्याचे जीव गेल्यास विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
कोटगुल क्षेत्रातील अनेक गावे ही घनदाट जंगल परिसराला लागून आहेत त्यामुळे रात्री विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने अशा पद्धतीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने या क्षेत्रातील बहुतेक नागरिकांचे मोबाईल बॅटऱ्या लोव्ह झाल्या नंतर त्या चार्जिंग होत नसल्याने एखादया आपत्कालीन घटनेची माहिती सुद्धा ते देऊ शकत नाही.
अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तर अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे महागडे विद्युत उपकरणेही खराब होत आहेत. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोटगुल परिसरात ३१ जिल्हा परिषद शाळा, दोन पोलीस मदत केंद्र , एक प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन शासकीय आश्रमशाळा आहेत तर ६ ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायती अंतर्गत ४० गावे आहेत.
दरवर्षी पावसाळ्यांच्या दिवसात विद्युत पुरवठा खंडित झाले की ते पुन्हा केव्हा पूर्वरत सुरळीत होणार याची खात्री सुद्धा येथील नागरिकांना नसते. कोटगुल क्षेत्रातील ४० गावांना धानोरा तालुक्यातुन विद्युत पुरवठा दिलेला आहे. विद्युतची समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेकदा शासनाला निवेदन दिले मात्र समस्या सुटता सुटेना त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलनेही केली आहेत. मात्र या क्षेत्रातील विद्युत खंडित होण्याची समस्या कायम आहे.
चार पाच दिवसापासून या मार्गावरील विद्युत पुरवठ्यावर दोन ते तीन पोलांचे इन्सुलेटर फुटले, वीज झाडावर कोसळल्याने झाड पोलावर पडणे, ट्रान्सफर्मार मध्ये बिघाड झाले अशा कारणांमुळे कोटगुल परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाले होते ते बुधवारी सायंकाळी पूर्वरत सुरळीत झाले आहे.
एल लांडगे
अभियंता
वीज वि कं धानोरा.