कोरची:-स्थानिक कोरची येथील रिअल इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये इयत्ता ५ वीत शिकत असलेल्या भावेश सुशील आडिकने याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. नुकत्याच एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून भावेशने आपले व पालकांचे नावलौकिक केले आहे.
भावेशचे पालक मूळ भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसरा येथील रहिवासी असून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भावेश हा सुरूवातीपासूनच चाणाक्ष व अभ्यासू आहे. उच्चशिक्षित आई सौ. मिना आडिकने व वडील सुशील आडिकने यांच्या दैनंदिन सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या अंगभूत बुद्धिमत्तेला अधिक झळाळी मिळून तो ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेला आहे. त्याने प्राप्त केलेले यश हे इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे.
भावेशने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, गुरुजन व कुटूंबातील नातलगांना दिलेले आहे. त्याने प्राप्त केलेल्या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात असून कुटुंबीय, नातलग व स्नेही जनांकडून त्याच्यावर व पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे