गडचिरोली;- प्रवासी घेऊन जाणारा ट्रक काल 9 जुलै रोजी रात्री 9:30 ते 10:00 वाजताच्या दरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमेली नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती प्रशासनाला मिळताच आज पहाटेपासून एस डी आर एफ व पथक मार्फत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शोध मोहीमेदरम्यान नाल्यात अडकून असलेल्या ट्रक मध्ये तीन मृतदेह सापडल्याची माहिती आहे.
पुरात वाहून गेलेल्या ट्रकमध्ये जवळपास पाच ते सहा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना काल रात्रीची असल्याने प्रशासनाला उशिरा माहिती मिळाली. आज पहाटेपासून एसडीआरएफ व पथक व गावास्तरावरील यंत्रणा यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. नेमकं हे ट्रक कोणाकडे जात होती याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र, पुलावरून पाणी वाहताना वाहन टाकणे जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे.
आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरच्या कुमरगुडा आणि पेरमिली नाल्यावर पूर परिस्थिती कायम असल्याने प्रशासनाने कालच रहदारी बंद असल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे काल 9 जुलै रोजी याच पेरमिलीच्या नाल्यात जितेंद्र दोडके (40) नामक एम एस ई बी चा कर्मचारी (लाईनमन) पुरात वाहून गेला होता.त्याचा मृतदेह मिळाला होता.आता शोध मोहीम सुरू असून आणखी किती मृतदेह सापडतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.