मुल :- शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काही घरांची पडझड देखील झाली आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे व नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिले.
गेली दोन दिवस मुल शहरात झालेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सुमारे ३०० घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांन सामान वाहून गेले व काही घरांची पडझड देखील झाली आहे. नागरिकांना घर सोडून अन्यत्र निवारा शोधावा लागला आहे. या घटनेची तातडीने दखल घेत नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करावे आणि नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही त्वरेने करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांसह उपविभागीय अधिकारी मुल, तहसीलदार मुल आदींना आ. मुनगंटीवार यांनी दिले आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार नागरिकांना धान्य किट्स पुरवाव्या
मुल शहरातील भाजपा पदाधिका-यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांना भेटी देत तेथील माहिती घ्यावी व आवश्यकतेनुसार नागरिकांना धान्याच्या किट्स पुरवाव्या असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या परिस्थीतीत नागरिकांच्या पाठिशी भाजपा पदाधिकाऱ्यांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.