गडचिरोली:- 8 जुलै पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय हत्तीकॅम्पसाठी प्रसिद्ध असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर या गावाचा संपर्क तुटला आहे.
हवामान खात्याकडून राज्यात पुढील तीन दिवस म्हणजे 11 जुलै 2022 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून सध्या सर्वच नदी नाल्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेपनपल्ली ते कमलापूर दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला आहे. सकाळपासूनच हा मार्ग रहदारीसाठी बंद झालेला आहे.
कमलापूर गावालगत कोलामार्का रस्त्यावर असलेल्या नाल्याला सुद्धा पूर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पहाटे तीन वाजेपासून या परिसरात पाणीच पाणी असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचा नासधूस झाला आहे.सध्या पावसाचा जोर वाढत असून येथील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.सतत मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग रहदारीस बंद
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 130 D वरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामळे सदर राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते भामरागड वाहतुकीस बंद आहे.7 जुलै रोजी सदर बायपास रस्त्यावरील रपटा वाहून गेला होता.त्यामुळे रहदारीसाठी पुन्हा माती टाकून खड्डा बुजविण्याचे काम केले होते.मात्र,पुन्हा मुसळधार पावसाने सदर रपटा वाहून गेल्याने सदर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा बंद झाला आहे.