चंद्रपूर : दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लतादिदिंचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. पण आता तो सूर लुप्त पावला. लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. दिदी भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरल्या, असे भावनात्मक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.
लता दीदी…भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जागतिक संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. लता दीदींच्या निधनामुळे देशाने आज सर्वात मौल्यवान रत्न गमावले आहे.#LataMangeshkar
(1/2) pic.twitter.com/qoaiOIXvc3— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2022
लतादिदी किती महान होत्या हे सांगताना वडेट्टीवार यांनी सांगीतले की, लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मभूषण”, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मविभूषण”ने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल “भारतरत्न” या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. त्यांच्या जाण्याने एक जागतिक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज गायिका म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून गेल्या हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खाडीलकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे मंगेशकर बहिण भावंडांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.