वणी (यवतमाळ ) ” आईने आपल्या शैशवात आपल्याला झोपवण्यासाठी गायलेली अंगाई किंवा लाडात म्हटलेले अडगूळ मडगूळ पासून नकळत आपल्यावर कवितेचे संस्कार होत असतात. मात्र असा केवळ शब्दांचा समूह नाही तर कमीत कमी शब्दात अधिकाधिक भाव सुनियंत्रित व्यक्त करणारा, उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार कविता म्हणविला जातो. कवितेच्या स्वरुपात पोटातील ओठावर येते असे बहिणाबाई म्हणते तर ऊरी घुसळलो असा आली ओठावर गाणी अशा शब्दात विठ्ठल वाघ ती प्रक्रिया मांडतात. अशी कविता माणसाला व्यावहारिक आणि मानसिक, बौद्धिक अशा सर्वच दृष्टीने समृद्ध करते.” असे विचार कुटुंब रंगलंय काव्यात या विश्वविख्यात कार्यक्रमाचे सादर कर्ते विसुभाऊ बापट यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सिनर्जी या अभिनव उपक्रमात कविता सादरीकरण आणि करियर या विषयावर आभासी माध्यमाने ते विद्यार्थ्यांशी संवाद साधक होते.
याप्रसंगी संस्थेचे सचिव. ॲड.लक्ष्मण भेदी अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अनेकांच्या जीवनात पैसा आहे पण आनंद नाही, त्यामुळे जीवन नैराश्यग्रस्त आहे. अशा लोकांच्या समोर छंद आणि व्यवसाय यांचा समन्वय जीवनात कसा आनंदानुभूती देतो याचे प्रात्यक्षिक म्हणून विद्यार्थ्यांनी विसुभाऊ बापट यांचे जीवन आणि कार्य पाहायला हवे असे प्रतिपादन केले.
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली स्वरूपात समर्पित कार्यक्रमाची सुरुवात,
कोकिळा म्हणते लता मला सारेगमप शिकव !
माझ्या कुहूकुहू मध्ये तुझे एक गाणे बसव ! या सुमन फडके यांच्या कवितेने आरंभ करीत, कवितेचे स्वरूप, व्याख्या, प्रकार अशा अनेक गोष्टी स्पष्ट करीत, सातत्यपूर्ण वाचन श्रवण, प्रचंड पाठांतर, अखंड नवनवीन ग्रहण करण्याची आवड, स्मरणशक्ती अभिनयक्षमता, छंद, वृत्त उच्चारण शास्त्र इत्यादींचा विविधांगी अभ्यास, अनुभव घेण्याची वृत्ती आणि अलवार अंतकरण अशा विविध प्रकारच्या, कविता रसग्रहण आणि सादरीकरणासाठी आवश्यक गुणांचे वेगवेगळ्या दृष्टीने स्पष्टीकरण केले.
आलेल्या उत्कट अनुभवाच्या तिळावर या गुणांच्या साखरेचे पूट चढवले की कवितेचा हलवा तयार होतो असे सांगत,
डबक्यातल्या डुंबण्याला कधी पोहणे म्हणत नाहीत ! झोकून दिले नाही याला जीवन म्हणत नाहीत ! अशा विविध कवितांच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजूभाऊंनी आम्हाला कवितेच्या माध्यमातून साठ सत्तर वर्षाची सांस्कृतिक सहल घडविली असे सांगत एड. लक्ष्मण यांनी प्रसन्नता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विकास जुनगरी यांनी केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी डॉ गुलशन कुथे,पंकज सोनटक्के यांनी विशेष परिश्रम घेतले.