गडचिरोली:-जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागांतर्गत येणाऱ्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प स्थलांतरित करण्यासाठी आता १७ गावातील नागरिक एकवटले असून तसे निवेदन गुरुवारी २३ जून रोजी अहेरी येथील तहासिलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
सदर हत्तीकॅम्प हा कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आशा तलाव परिसरात असून हत्तीकॅम्प साठी प्रसिद्ध आहे.देशातील विविध राज्यातून याठिकाणी पर्यटक येत असल्याने राज्यात कमलापूर हे गाव नावलौकिक झाला आहे.मध्यंतरी येथील हत्तींना गुजरात राज्यातील जामनगर येथे हलविले जाणार असल्याने जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रभरातून याचा विरोध करण्यात आला. अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील हत्तींना गुजरात राज्यात हलविले. मात्र, कमलापूर येथील शासकीय हत्ती कॅम्प मधून एकही हत्ती बाहेर गेला नाही.मात्र,आता स्थानिक पातळीवरून हत्तीकॅम्प हलविण्याची मागणी केली जात आहे. कमलापुर, दामरंचा, मांडरा, कुरुमपल्ली या ग्रामपंचायत मधील नागरिकांनी स्वतः थेट हत्तीकॅम्प हलविण्यासाठी पुढाकार घेतला असून तसे ठराव सुद्धा परित केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, कमलापुर येथील हत्तीमुळे आशा,नैनगुंडम,नैनर, मोदुमडगु,पालेकसा, कोडसेपल्ली, मांडारा मदगु, दामरंचा, वेलगुर, कोयागुडाम, भांगारामपेठा, रुमालकसा, तोंडेर, सिटवेली, चिंतारेव, कुर्ता इत्यादी 17 गावातील लोकांना रस्त्याने ये-जा करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एवढेच नव्हेतर सदर गावातील शेतकऱ्यांचे शेत पिकांची सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अनेक वेळा मोटार सायकल व चारचाकी वाहनांची तोडफोड सुध्दा झालेली आहे.त्यामुळे सर्व हत्तींना यापूर्वी शासनाने ठरविलेल्या ठिकाणी स्थलांतरीत करावे अशी मागणी १७ गावातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे. एवढेच नव्हे तर हत्तींना त्वरित हलविले नाही तर या १७ गावातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना लच्या आत्राम गाव भुमीया आशा, गिल्ला गावडे आशा, वसंत शेगाम नैनगुडम, इंदरशाई कन्नाके नैनगुंडाम, मुत्ता मडावी सरपंच कुरुमपल्ली, संबाय्या करपेत माजी सरपंच कमलापुर, बालाजी गावडे माजी सरपंच येरमनार, प्रमोद कोडपे दामरंचा, जीलकरशहा मडावी माजी सरपंच दामरंचा, बाबुराव तोरेम सामाजिक कार्यकर्ते भांगारामपेठा, सम्मा कुसराम तोंडेर, मासा सिडाम सिटवेली, समय्या तलांडी चिंतारेव, मालू तलांडी, तिरुपती दुर्गे कोडसेपल्ली, बीच्यु आत्राम कपेवंचा, लक्ष्मण आत्राम कवटारामसह वरील 17 गावातील नागरिक उपस्थित होते.