भद्रावती :स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा महाविद्यालयीन विद्यार्थिनीला पुढील शिक्षण सुरु ठेवण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत समाजातील शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी मुला-मुलींना त्यांचे शिक्षण पुर्ण व्हावे याकरीता शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येत असते. परंतु सदर शिष्यवृत्तीचे वाटप हे काही नियमाच्या आधारावर होत असल्यामुळे समाजातील काही गरजु विद्यार्थी विद्यार्थीनी या नियमामध्ये बसत नसल्यामुळे सदर योजनेपासुन वंचित राहत असतात.
स्थानिक गौतम नगर, येथील वंदना उईके यांना काही कारणास्तव आपले महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडावे लागले पण शिक्षणाची जिद्द त्यांच्या अंगी असल्यामुळे आपण आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करायचेच या ध्यासाने त्यांनी विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे पुढील शिक्षणाकरीता प्रवेश घेतला. परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीला लागतो तो पैसा…! त्यामुळे त्यांना आपले शिक्षण पुर्ण करण्याकरीता पैशाची अडचण भासु लागली पण शासनाच्या नियमामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना आदिवासी विकास प्रकल्प चिमुर अंतर्गत आदिवासी मुला मुलींच्या शिक्षणाकरीता मिळणारी शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली परंतु त्यांनी आपली शिक्षणाची अडचण दुर करण्याकरीता भद्रावती वरोरा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेशभाऊ मेश्राम यांच्याशी संपर्क साधला व आपली अडचण सांगीतली. त्यांनी तात्काळ स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविंद्रजी शिंदे यांना सदर मुलीची अडचण सांगीतली व त्यांना मदत करण्याकरीता विनंती केली. ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्रजी शिंदे यांनी वंदना उईके ही परिक्षेपासुन वंचीत न राहावी या उद्देशाने तात्काळ ट्रस्ट च्या वतीने आर्थिक मदत दिली. सदर आर्थिक मदत ही स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या संचालिका श्रीमती सुषमाताई शिंदे यांच्या हस्ते आज (दि१७) ला देण्यात आली.
त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, शिवसेवा उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, अशोकभाऊ ताजणे अमोल शिंदे, व इतर मान्यवर उपस्थित होते.