वर्धा :-स्थानिक तरोडा येथील रहिवासी असलेले आत्माराम कृष्णाजी बोरकर वय वर्षे 56 व त्यांची पत्नी कुंदा आत्माराम बोरकर वय 44 वर्षे या 15 जून रोजी सकाळी तरोडा जवळ साकुर्ली येथे नदीच्या बांधावर वटपौर्णिमेच्या बार्शीनिमित्त पूजा करण्यासाठी गेले असता 15 ते 20 फूट पुलाच्या खड्ड्यात पडल्यामुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला.
सदर नदीवरील आमदार निधीतून पुलाचे बांधकाम चालू असून या पुलाचे बांधकामाकरिता नदीपात्रामध्ये पंधरा ते वीस फूट खोल खड्डे खोदले गेले आहे. त्यामुळे पूर्णतः पाणी भरलेले आहे. मात्र कंत्राटदाराकडून कुठलीही प्रकारची तटबंदी करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या कडेला लागून खड्डे खंदले असून, कंत्राटदाराकडून कुठल्याही प्रकारची सूचना अथवा फलक लावलेले नाही. त्यामुळे या घटनेस कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदारा विरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. मृतक हे कुटुंब प्रमुख असून त्यांचेवरच मुलांची व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांचे मुलांवर उदरनिर्वाहाचे फार मोठे संकट आलेले आहे. त्यांचे पाठीमागे एक मुलगा व दोन मुली असा आप्त परिवार आहे.